‘दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा’; राजू शेट्टी यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-76-780x470.jpg)
पुणे : ‘‘शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. कोणाचेही सरकार असो, शेतकऱ्यांसाठी लढा हेच आमचे कर्तव्यच आहे. शेतकऱ्यांची मागणी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
पिंपळगाव खडकी येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, बाबाजी खानदेशी, प्रकाश कोळेकर, रामदास बांगर, रामनाथ बांगर, भूषण आवटे, मंगेश बोराडे आदी उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीमालाला व दुधाला बाजारभाव मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. शेतीमालालाही योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकरी वर्गाने संघटित झाले पाहिजे. ’’
यावेळी प्रभाकर बांगर, संतोष पवार, तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता पोखरकर, दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर, स्वप्नील बांगर यांची भाषणे झाली. संदीप वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. पशुखाद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला योग्य बाजारभाव देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देताना अटी लावू नका. विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका. दूध दराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे दुधाने अंघोळ घालण्याचे आंदोलन करावे लागेल.