चांदणी चौक ते माले रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’ला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
![District Collector's instructions to State Road Development Corporation to check the quality of work on Chandni Chowk to Male Road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/chandani-chauk.jpg)
पुणे |
गेली चार वर्षे रेंगाळलेले काम आणि ठेकेदार कंपनीने केलेल्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चांदणी चौक ते माले या रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्याची सूचना ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’ला (एमएसआरडीसी) केली आहे. चांदणी चौक-कोलाड या महामार्गावरील चांदणी चौक ते माले या रस्त्याचे काम ‘रोडवे सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’कडून केले जात आहे. साधारण अठरा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. हे काम रेंगाळल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. या कामाबाबत स्थानिक पत्रकारांनी सातत्याने आवाज उठवला होता. एका शिक्षकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्रकारांनीच उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन ठेकेदाराला काम सुरू करण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. चांदणी चौक – कोलाड महामार्गाचे संथगतीच्या चाललेल्या कामाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी वेळोवेळी निवेदने देऊन मागण्या मांडल्या आहेत. या रस्त्याचा दर्जा खूप खालावलेला आहे. बांधणी योग्य नसल्याने पावसाचे पाणी साचून रस्ते आणखी खराब झाले आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदार कंपनीचे अधिकारी बी. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
- साइड पट्ट्या ‘अडगळीत’
रस्त्याचे काम करताना ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या साइड पट्ट्या भरून घेततेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. रामनदी आणि ठिकठिकाणच्या ओढ्यांवरील पुलाच्या ठिकाणी नव्याने कामे झालेली नाहीत. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला पावसाळी गटारे आवश्यक आहेत. ती देखील काढलेली नाहीत.
- माहितीफलकांचाही अभाव नाहीत
सरकारी विकास कामांच्या ठिकाणी माहितीफलक लावणे बंधनकारक असते. मात्र, या रस्त्याच्या कामांसंबंधीचे अंदाजपत्रक आणि कामाचा दर्जा याबाबतचे माहितीफलक कोठेही लावलेले नाहीत. नागरिकांना आणि मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याची माहिती मिळावी, यासाठी माहितीफलक तातडीने लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. चांदणी चौक-माले रस्त्याच्या कामात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, ही छायाचित्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केली आहेत.