पुण्यात धंगेकरांचा प्रचार मंदावला : कॉंग्रेस अंतर्गत निर्माण झालेले रूसवे-फुगवे कोण दूर करणार?
लोकसभा निवडणूक रणसंग्राम : महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळेही डोकेदुखी
![Dhangekar's campaign slows down in Pune: Who will remove the ruts and bloats created under Congress?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Ravindra-Dhangekar-1-780x470.jpg)
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत चमत्कार केल्यानंतर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी जाहीर होण्याची आधी आणि त्यानंतर कॉंग्रेस अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली. यातच नाराज कॉंग्रेसचे नेते आबा बागुल यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर काही दिवसांपुर्वी एक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्याची शाब्दिक चकमक झाली होती. वरिष्ठ नेत्यांच्या वादात कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण होत असताना धंगेकरांच्या प्रचाराचा वेग देखील मंदावत असल्याचं पुण्यात दिसून येत आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या निवडणुक प्रचार प्रमुखपदी माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही जबाबदारी जोशी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने तसेच वरिष्ठ नेत्याचे हेवेदावे समोर येऊ लागल्याने धंगेकरांचा प्रचार मंदावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तर महाविकास आघाडीकडून तसेच कॉंग्रेसकडून पुणे शहाराच्या प्रभारीपदी विश्वजित कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र कदम सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ अद्याप तरी मिळालेला नाही. त्यामुळे प्रचाराला आता कमी कालावधी राहिला असताना रूसवे-फुगवे दुर करून सर्वांना एकत्र आणणार कोण ? असा प्रश्न कॉग्रेससमोर निर्माण झालाय.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रभारी शहाराध्यक्ष माजी नगरसेवक अरविंद शिंदे हे आहेत. दोन आठवड्यांपुर्वी केसरीवाडा येथे झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यातून ते बाहेर पडले होते. त्यावरूनही कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पुण्यात कॉंग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची मोठी डोकेदुखी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.