breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी जमावबंदी; १४४ कलम लागू

लोणावळा – लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले असे म्हणताच दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करूनदेखील नागरिक गर्दी करत असल्याने अखेर आज (१६ जुलै)पासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वेगाने वाहणाऱ्या, खोल पाण्यात उतरणे, त्यात पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, थरमाकॉल-प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, इत्यादी बाबींवर कडक बंदी घालण्यात आली आहे.

भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहणार असून प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button