
पुणे : रविवार पेठेतील एका जुन्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील अरुंद गॅलरीत एक गाय अडकली होती. गाईला ना खाली येता येईना, ना हालचाल करता येईना. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे साडेचार-पाच तास शर्थीचे प्रयत्न करून क्रेनच्या मदतीने गाईची सुखरूप सुटका केली.
परदेशी यांच्या जुन्या वाड्यात दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत गाय अडकून पडली आहे. जुन्या लाकडी जिन्यावरून गाईला परत येणे अवघड झाले आहे, असा कॉल शुक्रवारी सकाळी अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रास आला. त्यानंतर अग्निशामक दलाचे प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर, तांडेल मंगेश मिळवणे, फायरमन तेजस पटेल, सागर शिर्के, तेजस चौगुले, निकेतन पवार, चालक प्रशांत कसबे आदी जवान घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा – चाकणमधील ‘त्या’ पीडीतेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा
अरुंद जिन्यामुळे गाईला जिन्याने खाली आणणे अवघड होते. गाईला कोणतीही दुखापत पोचू नये, यासाठी महावितरणच्या मदतीने वीज पुरवठा बंद करण्यात आला. जवानांनी कोणतीही जोखीम न पत्करता गाईला सेफ्टी बेल्टने बांधले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने गाईला खाली सुखरूप उतरवण्यात आले. त्यानंतर गाईची मालकी असलेल्या गणेश पेठेतील सुनीता चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले.
श्वानांच्या भीतीने गाय दुसऱ्या मजल्यावर
रविवार पेठ परिसरात काही भटक्या श्वानांनी या गाईचा पाठलाग केला. त्यावेळी परदेशी यांच्या वाड्यातील जिन्याचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे घाबरलेली गाय वाड्यात जिन्यावर चढली. परंतु श्वानांनी वरच्या जिन्यापर्यंत पाठलाग केला. त्यामुळे गाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.