#CoronoVirus:पुण्यातील कोविड रुग्णालय दहा दिवसात फुल्ल, रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sasoon-hospital-1.jpg)
पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईत आणि पुण्यात बसला आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात काल (25 एप्रिल) नव्या 90 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 184 इतका झाला आहे. पुण्यातील वाढत्या रुग्णांमुळे ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसातच फुल्ल झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना अन्यत्र हलवले जात आहे.
पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ससून रुग्णाच्या आवारात असलेल्या 11 मजली इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विक्रमी वेळेत या इमारतीचे काम पूर्ण केले होते. त्यानंतर सोमवार 13 एप्रिलला ही इमारत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली होती.
यानंतर या इमारतीत असंख्य रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. यात इमारतीत पहिल्या टप्प्यात अतिदक्षता विभागात 50 आणि विलगीकरण कक्षात 100 अशा 150 रुग्णांची व्यवस्था केली गेली. सद्यस्थितीत या कोविड रुग्णालयात 113 रुग्ण असून त्यातील 31 रुग्ण हे गंभीर आहे. तर इतर 33 रुग्ण हे सणस मैदान येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे.
दरम्यान दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता रुग्णालयांच्या क्षमतेत वाढ होणे गरजेचे आहेत. या कोविड रुग्णालयात जागा नसल्याने काही रुग्णांना इतर हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर काही ठोस निर्णय घ्यावे, अशी विनंती करण्यात येत आहे.