#CoronaVirus:भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/3bhushi_dam.jpg)
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात आहे. दरवर्षी मुंबई, पुण्यासह राज्यभरातून पर्यटक पावसाळ्यात पर्यटनासाठी भुशी डॅम, घाट परिसर, गड- किल्ल्यांवर जातात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पावसाळा सुरु झाला की, अनेकजण मित्र मैत्रिणींसह पिकनीकची तयारी करत असतात. कोणत्या ठिकाणी फिरायला जायचं याचं प्लनिंगही पावसाळ्यापूर्वी झालेले असते. गड-किल्ले, डॅम, घाट परिसर दर पावसाळ्यात वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते.
मात्र यंदा कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन असणाऱ्या ठिकाणांना बंदी घालण्यात आली आहे. यात लोणावळ्यातील भुशी धरण, पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण, ताम्हिणी घाट परिसर, खडकवासला धरण, भीमाशंकर, माळशेज घाट, भाटघर धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गडकिल्ले आणि पानशेत धरण परिसरातही पर्यटनाला बंदी आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे यंदा कोरोनामुळे मुंबईसह पुणेकरांना पावसाळी पर्यटनाला मुकावे लागणार आहे.