#Coronavirus : नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे – राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-151.png)
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. करोना कक्षात त्यांना ठेवण्यात आलं आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
करोनाचे दोन संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. तसंच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.
करोनाच्या रुग्णांसंबंधी देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे दोघेही दुबईला जाऊन आले होते. त्यांनी नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. एका रुग्णामध्ये करोनाची सौम्य लक्षणं दिसत असून दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणं आढळलेली नाहीत. रग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.