TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संगणकप्रणाली

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाडून (म्हाडा) सदनिका, भूखंडांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. त्यामध्ये विजेते आणि प्रतीक्षा यादी जाहीर होऊन अर्ज छाननी, कागदपत्र तपासणी, देयकरार पत्र आदी प्रक्रिया प्रत्यक्ष म्हाडा कार्यालयात जाऊन करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. तसेच मानवी हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया जलदगतीने आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन संगणकप्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याला राज्य सरकारने मान्यताही दिली आहे.

म्हाडाकडून सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढली जाते. सोडतीच्या जाहिरातीपासून, अर्ज स्वीकृती, त्यानंतर विजेत्यांची यादी, प्रतीक्षा यादी, आरक्षणानुसार अर्ज, अनामत रक्कम भरणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतरच्या काळात विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी, पात्रता तपासणी, पूर्ततेसाठी देण्यात येणारा कालावधी, कर्ज प्रक्रियेमध्ये लागणारा वेळ यामुळे बांधकाम विकासकांना देखील प्रतीक्षा करावी लागते. ही प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी नवीन संगणकप्रणाली तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संगणक प्रणालीला मान्यता दिल्याने पुणे म्हाडाकडून आगामी काळात जाहीर करण्यात येणारी सोडत नवीन प्रक्रियेनुसार होणार आहे. म्हाडाच्या नव्याने राबविण्यात आलेल्या सोडतीमध्ये सदनिकांसाठी प्रतीक्षा यादी नाही. त्यामुळे पुणे म्हाडाकडून दिवाळीपूर्वी तीन हजारांहून अधिक घरांसाठी काढण्यात येणारी सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. ही सोडत १ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये या संगणकप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

नव्या संगणकप्रणालीचा फायदा काय?

नवीन प्रणालीनुसार आता सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यानुसार आरक्षित प्रवर्गानुसार आणि उत्पन्न गटानुसार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नवीन कळफलक देण्यात आले आहेत. त्यामध्ये इच्छुकाला आवश्यक सर्व कागदपत्रे (आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेची कागदपत्रे, निवासी दाखला, पत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आरक्षणानुसार प्रमाणपत्र) आदी स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे सोडतीपूर्वीच पात्रता सिद्ध होणार आहे. परिणामी प्रतीक्षा यादी वगळून थेट विजेत्यांची यादीच जाहीर होणार आहे. सदनिका लागलेल्यांना देखील त्याच दिवशी पात्रता कळल्याने थेट अनामत रक्कम भरून देयकरार पत्र प्राप्त करता येणार आहे. या नवीन संगणकीकृत प्रणालीमुळे इच्छुकांना फायदा होणार असून तक्रार करण्यास वाव राहणार नाही, असेही म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी माने-पाटील यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button