मिळकतकर अभय योजनेबाबत आयुक्तांचा मोठा निर्णय!

पुणे : महापालिकेचा थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२५ पासून अभय योजना सुरू केली आहे. यामध्ये मिळकतकराच्या थकबाकीवर ७५ टक्के सवलत दिली जात आहे.
महापालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीसाठी सुरू केलेल्या ‘अभय योजने’ला आता पुढील महिन्यात १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय सभासदांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अभय योजना १५ मार्चपर्यंत सुरू राहील, असे जाहीर केले.
महापालिकेच्या सभासदांनी केलेल्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात येत असून, मिळकतकराची थकबाकी प्रलंबित असलेल्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्त राम यांनी केले आहे. यामुळे आता एक महिना थकबाकीदारांना सवलतीच्या दराने थकलेला मिळकतकर भरण्याची संधी मिळणार आहे.
महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अद्यापही अनेकांना याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे या योजनेला एक महिना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी त्याला पाठींबा दिला.
हेही वाचा – तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद, महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचा महत्वाचा निर्णय…
दरम्यान, काही नगरसेवकांनी विरोधी भूमिका मांडत ही मुदतवाढ नियमितपणे कर भरणाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे म्हटले. तर काहींनी या योजनेअंतर्गत दंड व व्याजात सवलत देण्यात येत असल्याने वर्षानुवर्षे थकलेला मिळकत कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, आता मुदत संपत आल्याने अनेक करदाते संभ्रमात असल्याची स्थिती निर्माण झाली असून मुदतवाढ मिळाल्यास थकबाकीदारांकडून कर भरण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल, असा दावा काही सदस्यांनी केला.
‘महापालिकेच्या महसूलवाढीसाठी अभय योजनेला मुदतवाढ आवश्यक आहे. अभय योजनेच्या मुदतवाढीबाबत महापौर आणि प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेऊ,’ असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर बीडकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देऊन अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अभय योजनेला एका महिन्यांची मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. या योजनेस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. या योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. सभासदांच्या भावनांचा विचार करून आणि महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अभय योजना ला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले.




