महापालिकेच्या चुकीचा नागरिकांना भुर्दंड

पुणे : शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात १ लाख ८० हजार पाणी मीटर बसविले आहेत. यात प्रामुख्याने व्यावसायिक अस्थापनांना मोठ्या प्रमाणात मीटर बसविले आहेत. मात्र, या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महापालिकेकडे केवळ २४ मीटर रिडर असल्याने अनेक व्यावसायिकांना वर्षभरापासून बिलेच दिली नसल्याने आता अनेक व्यावसायिकांना लाखो रुपयांची बिले महापालिकेने पाठविली आहेत. याबाबत प्रशासनाकडे असंख्य तक्रारी आल्या असून, ही बिले कमी करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवित हात वर केले आहेत. परिणामी, या व्यावसायिकांना चांगलाच मनस्ताप झाला असून, महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरात पाणीपट्टीसाठी मीटर पद्धतीचा वापर सुरू झाला असला, तरी निवासी वापराच्या ठिकाणी लावलेल्या मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. एकीकडे १ लाख ८० हजार मीटर बसविले आहेत, तर दुसरीकडे त्यांचे रीडिंग घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे केवळ २४ मीटर रीडर आहेत. अनेक वर्षांपासून या पदांची भरती झालेली नाही आणि दरवर्षी कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. मीटर रीडरच्या मंजूर ८३ पदांपैकी ५९ पदे रिक्त आहेत. मीटरची संख्या पाहता मंजूर पदेही कमी असून, भविष्यात ती वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मिस्त्री आणि मुकादम या पदांचीही सुमारे ५० ते ५५ पदे रिक्त आहेत.
हेही वाचा – शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी
बावधन येथील डीएसके रानवारा सोसायटीत सुमारे ५०० हून अधिक सदनिका आहेत, तसेच काही व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे या सोसायटीसाठी महापालिकेने २ निवासी आणि १ व्यावसायिक नळजोड दिला आहे. त्या रीडिंग नियमित घेऊन त्यांना प्रत्येक महिन्याला बिले दिली होती. मात्र, मागील वर्षभरापासून व्यावसायिक नळजोडाचे रीडिंगच घेतलेले नाही. त्यानंतर आता वर्षभराने अचानक २४ लाखांचे बिल दिले आहे. यापूर्वी दर महिन्याला ७० ते ८० हजार व्यावसायिक नळजोडाचे बिल येत होते. आता थकबाकीवर दरमहिन्याला १ टक्के व्याजही आकारले जात आहे. याबाबत सोसायटीच्या सचिव माधुरी देशपांडे यांनी तक्रार केली असून, महापालिकेने यात लक्ष देण्याची मागणी केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
नवीन मीटरमुळे पाण्याची अचूक नोंद होत असल्याने पाणीपट्टी वाढल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विशेषतः व्यावसायिक मिळकत असलेल्या निवासी गृहसोसायट्यांमध्ये या तक्रारी अधिक आहेत. मीटर नादुरुस्त असल्यास पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाते.
– प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता