अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी येणार पुण्यात

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सोमवारी (१५ डिसेंबर) करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागांतील तसेच उपनगरातील प्रकल्पांचा समावेश असून, सर्व कामांचे एकत्रित उद्घाटन करण्यात येणार आहे. भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी विशेष उत्सुकता दाखवत आहेत.
पुणे महापालिकेत गेल्या साडेतीन ते पावणे चार वर्षांपासून प्रशासन कारभार आहे. सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम राबवता आला नाही आणि महापालिकेवर आयुक्तांकडून प्रशासन चालवले जात आहे. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रखडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या.
हेही वाचा – ई-पीक पाहणी आता ऑफलाईन! नोंदणी न केलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
सर्व निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून ते १४ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून, निवडणूकपूर्व कामकाजाला आता गती मिळाली आहे.




