क्रिडाताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान – स्वप्नील कुसाळे

“हे यश माझ्या एकट्याचे नसून माझे कुटुंबीय, माझे गुरु, प्रशिक्षक अशा सर्वांचे स्वप्नील कुसाळे याचे मत

पुणे : ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे भारतात आगम झाल्यानंतर आज पुण्यात त्याचे जंगी स्वागत करीत जाहीर सत्कार करण्यात आला. महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी स्वप्नील यांची उघड्या जीपमधून भव्य स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्टेडीयममध्ये झालेल्या

कार्यक्रमात मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडाआयुक्त डॉ राजेश देशमुख, ऑलिम्पिक ज्युरी पवन सिंह, स्वप्नील यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, आई अनिता कुसाळे, वडील सुनील कुसाळे, अक्षय अष्टपुत्रे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी देत यावेळी स्वप्नील यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधत स्वप्नील यांचे अभिनंदन केले.

मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगत स्वप्नील कुसाळे म्हणाले, “हे यश माझ्या एकट्याचे नसून माझे कुटुंबीय, माझे गुरु, प्रशिक्षक, मला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मित्र मंडळी, प्रायोजक अशा सर्वांचे आहे. हे पदक मी या सर्वांना अर्पण करतो.”

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “१९५२ नंतर २०२४ साली स्वप्नीलच्या रूपाने महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपला आहे. आई वडीलांचे श्रम स्वप्नीलच्या या पदकाने सत्कारणी लागले आहेत असे म्हणता येईल. त्याच्या यशात गुरु दिपाली देशपांडे यांचाही मोलाचा वाटा आहे. गगन नारंग अंजली भागवत, सुमाताई शिरुर, दिपाली देशपांडे या चौघांनी भारतीय आणि महाराष्ट्रातील नेमबाजीला योग्य दिशा दिली आहे असे म्हणता येईल.” खेळाडूंसाठी राज्य शासन देखील तत्पर असून वेळोवेळी मदतीसाठी तयार आहे याची खात्री बाळगा, असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

२०१२ साली अंगकाठीने अगदी लहान असलेला स्वप्नील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीत दाखल झाला होता आज ऑलिम्पिक पदक जिंकून आलेल्या स्वप्नीलची भव्य मिरवणूक पाहताना या सर्व आठवणी नजरेसमोरून गेल्या, असे सांगत स्वप्नीलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे म्हणाल्या, “स्वप्नीलच्या आई वडिलांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि आम्हा सर्वांचा विश्वास स्वप्निलने सार्थ ठरविला याचा आम्हाला अभिमान आहे. मागची १२ वर्षे त्याच्या आई वडिलांनी मला एकदाही फोन केला नाही आज थेट त्यांची कार्यक्रमात भेट होत आहे यावरून त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास लक्षात येईल. आज स्वप्नीलला केवळ एक ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू नाही तर भारताचा जबाबदार नागरिक म्हणून पाहताना आनंद होत आहे.”

स्वप्नीलचे वडील यांनी यावेळी आपल्या मुलाला नेमबाज म्हणून घडविताचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. घराच्या बिकट परिस्थितीची जाणीव आम्ही कधीच स्वप्नीलला होऊ दिली नाही असेही ते म्हणाले. डॉ राजेश देशमुख यांनी सरकार खेळाडूंसाठी करीत असलेल्या मदतीविषयी माहिती दिली आणि स्वप्नील कुसाळे यांचे कौतुक केले. पवन सिंह यांनी प्रास्ताविक केले. तुषार जोशी यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button