खासगी रुग्णालयांना दलालांचा विळखा; वैद्यकीय बिले कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनावर दबाब
![Brokerage to Private Hospitals; Pressure on hospital administration to reduce medical bills](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/hospital-1-780x470.jpg)
शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांच्या आवारात वैद्यकीय बिल कमी करून देण्याची बतावणी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. रुग्णांचे बिल कमी करून देणारे दलाल; तसेच त्यांच्या साथीदारांकडून रुग्णालयाच्या प्रशासनावर दबाब आणला जात आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयाच्या परिसरात असे प्रकार घडत आहेत. रुग्ण किंवा नातेवाइकांकडून तक्रारी दाखल केल्या जात नसल्याने दलालांचे फावले आहे.रुग्णांच्या नातेवाइकांकडून याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या जात नाहीत. पुणे शहरातील अनेक नामवंत रुग्णालयांत असे प्रकार घडतात. रुग्णालयाच्या प्रशासनावर दबाब आणून बिल कमी करून घेतले जाते. बिल कमी करण्यासाठी दलाल रुग्णांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मध्यभागातील एका रुग्णालयाकडून याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात नुकतेच पत्र देण्यात आले आहे. एकाने रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील कर्मचारी वर्ग; तसेच रुग्णालयातील महिला अधिकाऱ्याला धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती नेहमी रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागातील कर्मचारी वर्गाशी बिल कमी करून घेण्याबाबत अरेरावीची भाषा करतात, अशी तक्रार वैद्यकीय प्रशासकांनी पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.
फसवणूक अशी केली जाते…
शासनाच्या विविध योजनाअंतर्गत रुग्णांचे बिल कमी करून दिले जाते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून याबाबत कागदपत्र सादर केली जातात. कागदपत्रात काही त्रुटी आढळल्यास नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. उत्पनाचा दाखला जोडावा लागतो. उत्पनाचा दाखला न जोडल्यास अडचणी येतात. उत्पन्नाचा दाखला काढण्याचे शासकीय शुल्क कमी असते. मात्र, काही प्रकरणांमध्ये बिल कमी करून देण्याची बतावणी करणारे दलाल उत्पन्नाचा दाखल काढून देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांकडून दोन ते पाच हजार रुपये घेतात, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात पंतप्रधान योजना तसेच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून रुग्णांचे बिल माफ केले जाते. खासगी रुग्णालयात धर्मादाय विभाग असतो. या विभागाकडून रुग्णांना उपचार खर्चात सवलत दिली जाते. मात्र, दलाल बिल कमी करून घेतल्याची बतावणी करून रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळतात, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाच्या प्रशासनावर राजकीय कार्यकर्त्यांचा दबाब
रुग्णालयाच्या प्रशासनावर विविध राजकीय पक्षाचे दबाब टाकतात. बिल कमी करून घेण्यासाठी अरेरावी केली जाते, अशाही तक्रारी आहेत. रुग्णालयाच्या परिसरात वास्तव्यास असलेले सराईत गुन्हेगार हे रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांवर दबाब टाकून अरेरावी करतात.
रुग्णांच्या नातेवाइकांना नाडण्याचे प्रकार
काही रुग्णालयातील कर्मचारी गैरप्रकारात सामील असतात. रुग्णालयाच्या नातेवाइकांना बाहेरून ओैषधे आणण्यास सांगितले जाते. रुग्णालयाच्या परिसरातील औषध विक्रेत्यांना कर्मचारी रुग्णांच्या नातेवाइकांचे क्रमांक उपलब्ध करून देतात. त्या बदल्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना औषध विक्रेते काही दरमहा रक्कम मोजतात, अशी माहिती सूत्रांंनी दिली.
पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन
रुग्णांच्या नातेवाइकांकडे बिल कमी करून देण्याची बतावणी; तसेच रुग्णालयातील प्रशासनाला धमकावल्याच्या तक्रारी आल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. रुग्णांच्या नातेवाइकांनी दलालांपासून सावध राहावे. काही गैरप्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी केले आहे.