राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुडलक चौकात जनजागृती अभियान

पुणे : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने डेक्कन वाहतूक विभागातर्फे आणि एमएमसीसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने गुडलक चौक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा उद्देश वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या अभियानादरम्यान NSS च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियम, सिग्नल व्यवस्था, नो पार्किंग, वाहनचालक परवाना व इतर आवश्यक वाहतूक नियमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे फलक हातात घेऊन गुडलक चौकातील सिग्नल परिसरात वाहनचालकांना संदेश देत नियम पाळण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये
या जनजागृती अभियानात वाहतूक विभाग परिमंडळ २ येथील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस उपनिरीक्षक मालुसरे, डेक्कन वाहतूक विभागातील अंमलदार, एमएमसीसी महाविद्यालयाचे सुमारे ४० NSS विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्य सहभागी झाले होते.
सदर अभियान सकाळी ११.४५ ते १२.३० या वेळेत यशस्वीपणे पार पडले असून, याबाबतचा सविस्तर अहवाल वाहतूक मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती डेक्कन वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.




