पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, एकाला अटक

पुणे | पुणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरज शुक्ला याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला हा कोयता हातात घेऊन पुतळ्यावर चढला आणि त्याने पुतळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली.
हेही वाचा : ‘एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस’; अशोक सराफ
सुरज शुक्ला याने यापूर्वीही महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने या कृत्याचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, त्याच्या मनात महात्मा गांधींबद्दल द्वेष असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या घटनेने पुणे शहरात संतापाची लाट पसरली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय घटना आहे. अशा कृत्यांना समाजात स्थान नाही. सरकारने याप्रकरणी कठोर कारवाई करावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.





