breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

पुणे : महापालिकेचा आरोग्य विभाग कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सातत्याने चर्चेत आहे. आरोग्य विभाग प्रमुखपदावरून तर चांगलीच गटबाजी सुरु आहे. गेल्या काही दिवासात आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन झाल्याने विभागाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांना तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले असून उत्तर देण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, लिपिक मनोज पानसे आणि शिपाई बाबा इनामदार यांच्यावर रुग्ण हक्क परिषदेने तक्रार केल्यानुसार भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीची दखल घेत प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी थेट  या तक्रारीबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर योग्य खुलासा न आल्यास अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरोप झालेल्या अधिकाऱ्यांकडून नेमका काय खुलासा येणार याकडे लक्ष लागलेले आहे. रुग्ण हक्क परिषदेने प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. बळिवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसारच खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा    –      पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक 

शहरी गरीब योजना खिळखिळी करण्याचे काम सुरू आहे. गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील मोठ्या रुग्णालयांकडून या योजनेची देयके मंजूर करून घेण्यासाठी मोठी लाच स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून त्यांची चौकशी करावी. असे आरोग्य प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत नमूद करत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

रुग्ण हक्क परिषदेने आरोग्य विभागाकडे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. तक्रार आल्यानंतर त्यावर कार्यवाही करणे बंधनकारक असते. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेली नोटीस ही कारणे दाखवा नोटीस नसून तो खुलासा मागवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्तांच्या आदेशाने कारणे दाखवा नोटीस देता येते. तशी नोटीस देण्यास सांगण्यात आले तर ती देण्यात येईल. मात्र सध्या कोणतीही कारणे दाखवा नोटीस नाही तर फक्त खुलासा मागवलेला आहे. नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्यास दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केला जाईल.

– डॉ. कल्पना बळिवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button