पुणे पोलिसांची कारवाई; १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-5-3-780x470.jpg)
पुणे : पुण्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याचं वृत्त पोलीस कारवाईनंतर समोर आलं आहे. पुण्यामधून गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वर्तुळातील अनेक घडामोडी समोर आल्या आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणासंदर्भातील माहिती अद्यापही समोर येत असून, याची चर्चा थांबत नाही तोच पुण्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५२ किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एम डी) जप्त केलं असून, आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एम डी ची किंमत २ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेने धाड टाकून हे अमली पदार्थ जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकेटमधून या पावडरची विक्री केली जात होती. सोमवारी पुणे पोलिसांनी याप्रकरणी धडक कारवाई करत अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली.
हेही वाचा – अभिनेत्री प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नंतर मागितली माफी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाला माने सोमवार पेठेत दिलसा. त्याचवेळी करोसियाची त्याच्यासोबत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. ज्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांच्याकडे असणारे १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान दोघांच्याही चौकशीनंतर त्यांना हैदर शेखकडून हे ड्रग्ज मिळाल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांनी विश्रांतवाडी भागातून त्यालाही ताब्यात घेतलं.
दरम्यान, पुण्यातील ड्रग्स विक्रीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यात सापडलेल्या या ड्रग्सची विक्री देशातील विविध भागात तसचं परदेशात होणार होती. इतकंच नव्हे, तर पुण्यात पकडलेले एम.डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे त्यांची विक्री करण्यात येणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माने आणि हैदर यांच्याविरोधात आधीपासूनच अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. किंबहुना माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले होते. कारावासानंतरही त्यांनी ड्रग्स विक्री सुरुच ठेवली होती.