गोव्याला जाताना भीषण अपघात, पुण्यात राहणाऱ्या अभिनेत्रीचा मित्रासह मृत्यू
![Accidental accident on the way to Goa, death of an actress living in Pune with a friend](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Accident-1.jpg)
पुणे | गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात पुण्यात राहणाऱ्या नवोदित अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी ( दि. 20 ) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरी उमेश देशपांडे (वय 25) आणि शुभम देडगे (वय 25) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. ईश्वरी देशपांडे ही नवोदित अभिनेत्री होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ईश्वरी आणि शुभम हे सोमवारी पहाटेच्या सुमारास गोव्यातील अंजुना बीचकडे निघाले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अरुंद रस्त्यावरून जात असताना त्यांची कार एका झाडाला धडकली आणि जवळच असणाऱ्या खाडीत जाऊन कोसळली. बुडत असताना या दोघांनीही आम्हाला वाचवा असा धावा केला. परंतु पहाटेची वेळ असल्याने आणि अंधार असल्यामुळे कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. या घटनेत दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ईश्वरी आणि शुभम यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. त्यातूनच त्यांची मने जोडली होती आणि लवकरच ते लग्नही करणार होते. ईश्वरी पाषाण-सुस परिसरात तर शुभम हा नांदेड सिटी भागात राहत होता. साखरपुडा होण्याआधी दोघांनी गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु, गोव्याच्या दिशेने जात असतानाच दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला.