भरारी पथकाकडून अचानक ‘टेस्ट’; पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/पुणे-44-780x470.jpg)
पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अचानक मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १५ ते १७ जानेवारी या कालावधीत ही चाचणी होणार आहे.
राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने १० डिसेंबर २०२४ ते १० एप्रिल २०२५ कालावधीत कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १० टक्के शाळांतील विद्यार्थी यांनी संपादणूक पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. १५ जानेवारीला भाषा, १६ जानेवारीला गणित, १७ जानेवारी इंग्रजी याप्रमाणे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘पालिकेच्या दैनंदिन सेवा गतिमान करा’; आयुक्त शेखर सिंह यांचा विभाग प्रमुखांना आदेश
निवडलेल्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या शाळांना प्रश्नपत्रिका तपासणी पथक प्रमुखांना पाठविण्यात येतील. शाळा मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्याच्या प्रमाणात काढाव्यात. उत्तरपत्रिकेची शिक्षण विभागाच्या भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
मूल्यमापनाच्या दिवशी विषयाच्या मूल्यमापन चाचणी संबंधित निवडलेल्या शाळांना गोपनीय पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठविण्यात येतील. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत परीक्षा होणार आहे.