कचऱ्यात सापडलेली १० लाखांची पिशवी; अंजू माने यांनी प्रामाणिकपणाने केली परत

पुणे | पुण्यातील सदाशिव पेठेत घडलेल्या एका प्रसंगाने मानवी प्रामाणिकतेचे सुंदर उदाहरण उभे केले आहे. कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या अंजू माने यांनी कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपयांची पिशवी कोणतीही लालसा न ठेवता तिच्या मूळ मालकाला परत केली.
अंजू माने गेली २० वर्षे स्वच्छ संस्थाच्या माध्यमातून सदाशिव पेठ परिसरात कचरा संकलनाचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास त्या कचरा गोळा करत असताना संकलन केंद्राजवळ एक मोठी पिशवी पडलेली दिसली. सुरुवातीला त्या पिशवीत औषधे असावीत असा त्यांचा अंदाज होता. मात्र पिशवी उघडून पाहिल्यावर आत दहा लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे पाहून त्या थक्क झाल्या.
हेही वाचा : “हिंदू राहिला नाही तर…”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान चर्चेत
औषधे आणि मोठी रक्कम पाहून ही पिशवी कोणासाठी तरी अत्यंत महत्त्वाची असणार, असा विचार करून अंजुताईंनी कोणताही मोह न बाळगता पिशवी मालकापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. त्यांनी परिसरातील रहिवासी, दुकानदार आणि ओळखीतील लोकांशी संपर्क साधून पिशवी हरवलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
काही वेळाने परिसरात एक व्यक्ती अत्यंत चिंतेत काहीतरी शोधताना दिसला. अंजुताईंनी त्याला पाणी देऊन शांत केले आणि पिशवीतील औषधे व इतर माहितीच्या आधारे ती पिशवी त्याचीच असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी दहा लाख रुपयांची पिशवी त्या व्यक्तीला सुपूर्द केली. अंजुताईंच्या प्रामाणिक व संवेदनशील कृतीचे परिसरात कौतुक होत आहे. त्यांचे हे कृत्य सामान्य नागरिकांमध्येही प्रामाणिकतेचा संदेश देणारे ठरले आहे.




