लोकशाहीत कोणतेही परिवर्तन घडवण्याची क्षमता – प्रा.प्रकाश पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/व्याख्यानमाला-1.jpg)
चिंचवड- फुले-शाहू-आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी किंबहुना सर्वसामान्य माणूस हा सुज्ञ असल्याने कोणतेही परिवर्तन घडवण्याची क्षमता भारतीय लोकशाहीत आहे, असे मत राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि व्याख्याते प्रा.प्रकाश पवार यांनी केले.
मोहननगर येथे जयभवानी तरुण मंडळ आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संसदीय लोकशाही’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा.पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.जनार्दन मुनेश्वर होते. यावेळी मुख्य संयोजक मारुती भापकर, अरुण बुटाला, अरुण बकाल, प्रताप लोके, नामदेव जाधव, मानव कांबळे उपस्थित होते.
प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, “बाबासाहेब हयात असतानाच त्यांच्या काही अनुयायांनी त्यांची जयंती साजरी करायला सुरुवात केली होती. अर्थात व्यक्तिपूजेला बाबासाहेबांचा विरोध असल्याने त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता. भारतासह जगात अनेक ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात तीन प्रकारचे समुदाय कार्यरत आहेत. त्यापैकी दलित, गरीब आणि श्रमिक यांची कृतज्ञतेची भावना असते. दुस-या प्रकारात बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेला समुदाय असतो. तर तिसरा गट हा ‘व्होट’ बँकेवर डोळा ठेवून जयंती साजरी करतो. डॉ. बाबासाहेबांनी भारताला जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश बनवले, हे जागतिक स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे”.
”नैतिक राजकारणाची जागा आता व्यावसायिक किंवा कॉर्पोरेट राजकारणाने घेतली आहे. पूर्वीचे निष्ठावान कार्यकर्ते नामशेष झाले असून निवडणूक प्रचार आता कंत्राटदारांच्या हातात आला आहे. संसदीय लोकशाही आता अध्यक्षीय पद्धतीकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समाजकारणी आणि विचारवंत राजकीय भूमिका घेण्याचे टाळतात, हे लोकशाहीला विसंगत आहे; कारण राजकारणाच्या माध्यमातूनच संसदीय लोकशाही जिवंत राहील. अशी अनेक आव्हाने संसदीय लोकशाहीपुढे असली तरी सामान्य भारतीय माणूस बिकट परिस्थितीत रस्त्यावर उतरतो आणि त्यामुळेच संसदीय लोकशाही भारतात निरंतर नांदेल”, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजित शेंडगे यांनी केले. तर, संतोष गोलांडे यांनी आभार मानले.