पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने २० लाखाची मागितली खंडणी; ६ जण अटकेत
![20 lakh ransom demanded from big builder in Pune in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar; 6 arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/9374yrfh-5_202201754557.jpg)
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे.
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बड्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता.
बिल्डरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अटक आरोपी यांनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डर यांना फोन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगण्यात आले.
बिल्डर यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका असे सांगितले. तसेच बिल्डर यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच बिल्डर यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे करीत आहेत.