कोंडीमुक्त पुण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा

पुणे : शहरातील एकूण ३० मिसिंग लिंक पैकी १४ मिसिंग लिंक, तसेच ४७ ठिकाणी रस्त्यांवर होणाऱ्या बाॅटलनेक मधील ८ बाॅटल नेक तातडीनं काढण्यात येणार आहेत. याबाबत पुढील दोन दिवसात महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच, १५ आदर्श रस्त्यांसोबतच उर्वरीत १७ रस्त्यांचेही डांबरीकरण, रुंदीकरण तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणेही संयुक्तपणे कारवाई करून काढली जाणार आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच असून, ही कोंडी फोडण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यात येतात. या बाबी खर्चिकही असतात, तसेच त्यासाठीच्या मान्यता आणि निधीसह इतर प्रक्रीया पार पडण्यासाठी मोठा वेळ जातो. त्यामुळे , शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, पोलीस आणि पीएमआरडीए यांनी संयुक्तपणे एकत्र येत, कमी खर्च आणि कमी वेळेत पूर्ण होऊ शकणाऱ्या आणि कोंडी कमी होण्यास मदत होणाऱ्या उपाय योजना १०० दिवसात पूर्ण कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या सूचनांनुसार महापालिकेने पावलं उचलली आहेत.
हेही वाचा – १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
महापालिकेने विकास आराखडयात नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. तसेच अनेक रस्त्यांचे रूंदीकरणही केलेले आहे. मात्र, अर्धवट रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी रस्ते जोडलेले गेलेले नाहीत. परिणामी शहरात नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरात मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यात, कोंडी कमी करण्यासाठी ३० महत्वाच्या मिसिंग लिंक सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. तर ४७ ठिकाणी बाॅटल नेक स्थिती आहे. हे रस्ते तसेच बाॅटल नेक काढायचे असल्यास महापालिकेस जवळपास ५०० कोटींच्या निधीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने शासनास पत्रेही पाठविली आहेत, मात्र,अद्याप शासनाकडून निधी मिळालेला नाही.
याबाबत गुरूवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून शहरातील कोंडी फोडण्यासाठीच्या उपाय योजनांचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी पवार यांनी शासनाकडून तातडीनं निधी उपलब्ध करून दिला जाइल असे आश्वासन दिले. तसेच जे रस्ते शक्य आहेत त्या ठिकाणी तातडीनं कामे करून १०० दिवसात ते सुरू करण्याच्या सूचना केल्या.





