३१ वर्षानंतर पहिल्यांदाच यंदा पुणे फेस्टिव्हल रद्द
पुणे – राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे गेल्या ३१ वर्ष सातत्याने होत असलेला पुणे फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या गणेशोत्सव काळात संपन्न होणारा पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मात्र प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिव्हल यंदा केवळ श्रींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन विधिवत संपन्न होणार आहे.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन कला-संस्कृती, गायन-वादन, नृत्य, संगीत व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे आयोजन पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचे पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १० वर्षे आणि ३१ वर्षे केले जात आहे. पुणे फेस्टिव्हलने पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला आहे.