स्टाईल इज ब्रॅन्ड : कोरोनापासून बचावासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘फंडा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Ef2zwV9UcAATS2G.jpg)
लोकांना भेटण्यासाठी विशिष्ट बैठक व्यवस्था, ‘दो गज दुरी’चे नियोजन
खासदार, आमदारलाही ‘बॅरिकेड टेप’च्या आत प्रवेश करण्यास प्रतिबंध
पुणे । विशेष प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याल्यात अथवा निवासस्थानी कोरोना काळातही कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. पण, राजकारणात विशिष्ट शैलीमुळे तळागाळात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अजित पवार यांनी कोरोना काळात ‘दो गज दुरी’साठी चांगलाच ‘फंडा’ वापरला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी आज लावणी कलावंत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची भेट घेतली. कलावंताच्या मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी अजित पवार बसले होते. त्याठिकाणी बॅरिकेड टेपच्या आधारे सामाईक अंतराचे नियोजन केले होते. उपस्थित असलेल्या सर्वांच्या मागण्या लक्षात घेत असतानाच अजित पवार यांनी संबंधितांना अप्रत्यक्षपणे फिजिकल डिस्टंन्सिंगचा संदेश दिला. संबंधित फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर होत आहे.
हातात ग्लोज आणि तोंडावरचा मास्क न चुकता घालणारे अजित पवार कायम गर्दी वावरताना दिसत आहेत. पण, सामाईक अंतर सूचनांचे पालन अत्यंत काटेकोर करतात. निवासस्थानी अथवा कर्यालयात किंवा एखाद्या दौऱ्यात असताना अजित पवार स्वत: ज्या ठिकाणी बसतात त्या भोवती ‘बॅरिकेड टेप’ लावली जाते. विशिष्ट अंतरावर राहूनच मग अभ्यागतांना निवेदन, अर्ज किंवा पत्रव्यवहार करावा लागतो. एखाद्याच्या तोंडाला मास्क नसेल, तर अजित पवार आपल्या खास शैलीत समज देतात.
मध्यंतरी पत्रकार, नगरसेवकांनी सामाईक अंतर न ठेवल्यामुळे अजित पवारांनी संबंधितांना खडसावल्याचे सर्वज्ञात आहे. पण, आमदार, खासदार आणि मंत्री कोरोनाबाधित होत असताना अजित पवार यांच्यासारख्या ‘मास लीडर’ प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, अत्यंत गरजचेचे आहे. कडक शिस्तीचा नेता असलेल्या अजित पवार यांच्याकडून सर्वच लोकप्रतिनिधींनी अनुकरण करावे, अशी चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Ef2zw61UcAEVYet.jpg)