‘सारथी’ संस्थेच्या आक्षेपांबाबत चाैकशी करणार, संभाजीराजेंच्या उपोषणाची घेतली दखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5-9.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
‘सारथी’ संस्थेतील गैरकारभाराबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ‘ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार, तसंच या प्रकरणातील सर्व आक्षेपांबाबत चौकशी करणार,’ असं आश्वासन कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जात संभाजीराजेंची भेट घेतली. तसंच सारथी संस्थेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘सारथीची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द आहे. ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार आहोत. तसंच गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द करण्यात आले आहेत. संस्थेचे संचालक श्री. परिहार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करू. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार,’ अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली.
‘शाहू महाराज यांच्या नावाची संस्था सारथी हे महाराजांचे जिवंत स्मारक. सारथी मोडून काढायचं कारस्थान केलं जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना. एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थी काय करणार? एक माणूस त्याच्या अंगात आलं म्हणून काहीही करतो,’ असं म्हणत संभाजीराजेंनी प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर टीका केली.