साने गुरुजी नगर मनपा कॉलनीतील घरे मनपासेवकांना मालकी हक्काने द्या’
![Give the ownership of the houses in Sane Guruji Nagar Municipal Corporation to the Municipal Corporators.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/jadhav.jpg)
साने गुरुजी नगर बचाव कृती समितीची मागणी
बीओटी प्रस्तावाच्या विरोधात रहिवाशांची सभा
पुणे | प्रतिनिधी
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आंबील ओढ्यानजीक साडे चार एकर जागेत असलेली साने गुरुजी नगर वसाहत बांधकाम व्यावसायिकाला विकसित करायला देण्याचा प्रस्ताव आहे. याला रहिवाशांचा, साने गुरुजी नगर बचाव कृती समितीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलं. भाडे तत्वावरील चाळीतील ही घरे मनपा सेवकांना मालकी हक्काने द्या, अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कृती समितीच्या वतीने या विरोधात सभेचे आयोजन केले. या सभेत महापालीकेच्या प्रस्तावाला विरोध करत आपल्या मागण्या मांडल्या.
रहिवाशांच्या सभेला माजी नगरसेवक धनंजय जाधव, अॅड. गणेश सातपुते, महेश महाले, शाम ढावरे, दिलीप शेडगे, वामन क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
१८ कोटी रुपयांचे वर्गीकरण करून येथे शंभर घरे बांधण्याच्या आणि बीओटी तत्त्वावरील प्रस्तावाला रहिवाशांच्या सभेत विरोध करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या साने गुरुजी नगर मनपा कर्मचाऱ्याच्या वसाहत मालकी हक्काच्या संदर्भातील लढा मागील तीस वर्षांपासून चालू आहे. या बाबत मनपा आयुक्तांपासून पालिका पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. साडे चार एकर जागेत ११ इमारती , ६ बैठ्या चाळी असून त्यात ४५० खोल्या आहेत. यातील काही इमारती मोडकळीस आल्या असून सर्व जागेचा जुन्या मालकाशी वाद ही न्यायप्रविष्ठ आहे. पुणे शहराची स्वच्छता करणारे झाडूवाले, सफाई कर्मचारी आणि इतर असे सर्व ९५ टक्के हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या ठिकाणी राहतात.
कोरोना साथीच्या आधी साने गुरुजी नगर बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. काही बैठका मनपा मध्ये झाल्या होत्या. या बैठकीत महापौर, आयुक्त पासून सर्व संबंधित अधिकारी, विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बचाव समितीच्या वतीने माजी नगरसेवक धनंजय जाधव, ऍड गणेश सातपुते, महेश महाले दिलीप शेडगे, वामनराव क्षीरसागर सहभागी होऊन बीओटी का नको म्हणून आणि मनपा कॉलनी मालकी हक्काने, आणि सर्व 17 चाळी सोसायटी करून देणे बाबत सादरीकरण केले.
तत्कालीन महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरव राव यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची समिती नेमली. त्यामध्ये या समितीने या कॉलनी विकास करताना बीओटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसा अभिप्राय आयुक्तांना दिला. या कॉलनीची बीओटी रद्द झाली. परंतु 15 डिसेंबर 2020 च्या काही वर्तमान पत्रात ” स्थायी समितीच्या बैठकीत साने गुरुजी नगर कॉलनीत शंभर घरे बांधण्यासाठी 18 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आल्याची बातमी आली. या प्रस्तावातील एक खोली ४०० चौरस फूट असणार आहे. परंतु “शंभर घरेच का ?” असा प्रश्न सर्व रहिवासी आणि सेवकांना पडला म्हणून महापालिकेचा निषेध करण्यासाठी सर्व स्थानिक रहिवासी यांनी एक सभा घेतली , या सभेस तीनशे ते चारशे रहिवासी उपस्थित होते.