साडेसात हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची नोंदणी
पुणे, दि.11 – पुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून त्याला पहिल्या दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्या दोन दिवसांतच साडेसात हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास 10 मेपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची प्राथमिक माहिती भरावयाची असते. त्यामध्ये नाव, पत्ता, जात, आरक्षण आदी गोष्टींविषयी माहिती द्यायची असते. विद्यार्थ्यांना आरक्षण असेल तर त्यानुसार मुख्याध्यापकांमार्फत त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना अप्रुव्ह करून घ्यावे लागते. त्यानुसार पहिल्या दोन दिवसांतच साडेसात हजार विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेचा वापर करून प्रवेशासाठीची नोंदणी केली आहे.
आतापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 7 हजार 443 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 769 विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रुव्ह करण्यात आले आहे; तर 3 हजार 535 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो व्हेरिफाय झाले आहेत. 3 हजार 139 विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही तपासून झालेले नाहीत. जवळपास सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पुस्तिका दिल्या असून ज्या विद्यार्थ्यांनी अजुनही माहितीपुस्तिका घेतल्या नाहीत, त्यांना त्या केंद्रावर उपलब्ध करून दिल्या आहेत. –