सचिन तेंडुलकर यांची सीबीएससी बोर्डाला पत्र”प्रशस्ती’
- निर्णयाबद्दल अभिनंदन : 9 ते 12 वीपर्यंत शारीरिक शिक्षण अनिवार्य
पुणे – सीबीएससी अर्थात केंद्रीय माध्यमिक बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण विषय अनिवार्य केला आहे. बोर्डाच्या या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार सचिन तेंडुलकर यांनी अभिनंदन करत पत्रदेखील पाठविले आहे. सीबीएसईने हे पत्र संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
या पत्रात सचिनने म्हटल्याप्रमाणे, “मी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण आणि खेळ याची सांगड घातली जावी, असे सांगत आलो आहे. सीबीएईने 9 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण विषय अनिवार्य केल्याचे वाचले आणि खरोखरच याची गरज होती असे वाटले. भारत हा 2020 पर्यंत जगातील सर्वात तरुण देश बनणार आहे. परंतु आपण “ओबेसिटी’ या आजारातही सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहोत. हा तरुण, शारीरिकदृष्ट्या दुर्बल देश हे चित्रही भयानक आहे. या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याकडे जबरदस्त प्रमाणात स्पोर्टिंग कल्चर निर्माण व्हायला हवे. त्यामुळेच सीबीएईने घेतलेला निर्णय हा अतिशय चांगल्या दिशेने जाणारा आहे. खेळामुळे एखाद्या व्यक्तीचा मोठ्या प्रमणात विकास होतो.
बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील जाडेपणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु त्याबरोबरच बोर्डाने विद्यार्थी सुदृढ रहाण्याच्या दृष्टीकोनातून सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू करावा. खेळ हे फक्त शरीर चांगले ठेवण्यास मदत करत नाही तर त्यामुळे मानसिक शक्तीही वाढते. विद्यार्थ्यांची शिस्त, लक्ष्य, चारित्र्य चांगले राहण्यासही यामुळे मदत होते. भविष्यात चांगला, सुदृढ भारत घडविण्याच्या दृष्टीकोनातून आपण शारीरिक शिक्षण व खेळांना तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे,’ असेही सचिन तेंडुलकरने आपल्या पत्रात म्हटले आहे.