शौर्य दिनासाठी कडक बंदोबस्त; वाहतूक व्यवस्थेतही बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Bhima-Koregaon.jpg)
पुणे | १ जानेवारीला कोरेगाव भिमामध्ये विजयस्तंभावर २०२वा शौर्य दिन साजरा होणार आहे. याच धर्तीवर येथील परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला देशभरातून असंख्य नागरिक येणार असताना यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन गर्दीत काही गोंधळ होऊ नये आणि अफवा पसरू नयेत यासाठी एक जानेवारीला या परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवणे हा प्रशासनाचा उद्देश नसून अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
गर्दी होणाऱ्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एक जानेवारीला पोलीस आणि अन्य अत्यावश्यक विभागांसाठी हॉट लाइन ची व्यवस्था करण्यात आली आहेय. त्याशिवाय येणाऱ्या भाविकांना “इमर्जन्सी कम्युनिकेशन व्हॅन”ची सुविधा पुरवण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी या भागातील शाळा, आठवडी बाजार आणि अन्य कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत. वाघोली, लोणीकंद, पेरणे फाटा, कोरेगाव-भीमा, शिक्रापूर, सणसवाडी या भागातील मद्यविक्रीची दुकानंही बंद ठेवली जाणार आहे.