सहा मीटर रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण नको
![City Planning Committee Comprehensive Meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/bagul.jpg)
– काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांचा विरोध
– बागुल यांच्या मागणीला नागरिकांचा प्रतिसाद
पुणे | प्रतिनिधी
मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांना मुभा, सहा मीटर रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण अशामुळे चटई क्षेत्र निर्देशांकाचा ( एफएसआय ) चा सुळसुळाट होवून बांधकामे वाढतील, त्यातून शहर नियोजन ढासळण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी , नगररचना तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक महापौरांनी बोलवावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी निवेदनद्वारे केली आहे. बागुल यांच्या मागणीला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मोठया इमारतीचे शहर असे स्वरूप पुण्याला येईल, त्यातून पाणी, सांडपाणी निचरा, पाकींग, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी नागरी मूलभूत सुविधांचे प्रश्न उभे राहातील, केवळ मेट्रोचा खर्च भागविण्यासाठी इमारतींसाठी जादा एफएसआय दिला जाईल पण महापालिकेवर खर्चाचा ताण पडेल. शहराच्या सांस्कृतिक जीवनात बदल घडतील, पुण्याचे शांत जीवन जगणारे पुणे असे वर्णन जगभरात केले जाते, ही सामाजिक शांतता, एकोपा इमारतींच्या गर्दीत नाहीशी होईल. जुन्या पेठांमधील मध्यमवर्गीय दूरवर फेकले जातील. या दुसऱ्या बाजूचाही विचार होण्याची गरज आहे.
येत्या दहा वर्षात जे बदल घडत जाणार आहेत, त्यावर आगामी पन्नास वर्षासाठी नियोजन आणि सामाजिक दृष्टीने विचार व्हावा याकरिता लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांची बैठक घ्यावी. मेट्रो वा रस्ता रूंदीकरण विषय मंजुरी करताना बांधकामांच्या दुसऱ्या बाजूची चर्चा झालेली नाही, ती लवकरात लवकर व्हावी, असे आबा बागुल यांनी नमूद केले आहे.