शरद पवारांच्या निधीतून मामाच्या गोलिवडे गावात शाळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/download-11.jpg)
कोल्हापूर – मामाच्या गावाची प्रत्येकालाच ओढ असते. मामाच्या गावातील लहानपणीच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालतात. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मामाच्या गावातील आठवणी जपताना पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला खासदार निधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्या निधीतून जिल्हा परिषदेची अद्ययावत शाळा, कम्प्युटर लॅब आणि प्रयोगशाळा होणार आहे. एक कोटी २५ लाखांच्या प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.
गोलिवडे एक हजाराहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. पवारांनी जानेवारी २०१८ मध्ये गावाला भेट दिली होती. गोलिवडे त्यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या गोलिवडेच्या भोसले कुटुंबीयांतील. दरम्यान दौऱ्याप्रसंगी पवारांनी शाळेविषयी चौकशी केली. पहिली ते सातवीपर्यंत भरणाऱ्या विद्यामंदिराची इमारत जुनी आहे. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेल्याचे समजले. पवारांनी शाळेची इमारत अद्ययावत, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि अभ्यासिकेसाठी अर्थसाह्य करण्याचे ठरवले. त्यांच्याकडून नव्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध केला असून त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे नजीकच्या काळात इमारत बांधकामाला प्रारंभ होणार आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य डी. पी. त्रिपाठी यांच्या निधीतून गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. सभागृहाच्या बांधकामाचा सुमारे ६५ लाखाचा आराखडा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बहुउद्देशीय सभागृहासाठी निविदा आणि अन्य प्रक्रिया राबवली जाईल. पवारांच्या खासदार निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळेची नवी इमारत, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य प्रसाद खोबरे यांनी गोलिवडे विद्यामंदिराला पवारांचे नाव देण्याबाबत ठराव मांडला होता.
खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून गोलिवडेतील शाळेची इमारत आणि इतर बांधकामाच्या सुमारे सव्वा कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. जि. प. स्तरावर सध्या तांत्रिक प्रक्रियेचे काम सुरू आहे. स्थायी समिती सभेसमोर विषय मांडून निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (जि. प.)