विद्यार्थ्यांनी इतरांमधील चांगले गुण आत्मसात करून सुजान नागरिक बनावे – आमदार रोहीत पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200201-WA0049.jpg)
- आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धेचे बक्षिस वितरण
- आमदार रोहीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘कर्मवीर करंडक आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचा’ पारितोषिक वितरण समारंभ काल शनिवारी (दि. १) दुपारी चार वाजता महाविद्यालयात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य आमदार रोहित पवार तसेच बबन व ख्वाडा या मराठी सिनेमाचे अभिनेते भाऊसाहेब शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसरचे विद्यमान प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंधगाव तालमी संघाचे अध्यक्ष विकास राणवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, सूर्यकांत सरवदे उपस्थित होते.
अभिनेते भाऊसाहेब शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई – वडील आणि शिक्षकांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करावीत.
आमदार रोहित पवार म्हणाले की, कोणतेही काम करताना प्रामाणिकपणे करा. अगदी पथनाट्य सादर करताना आपल्याला दिलेली भूमिका प्रामाणिकपणे केल्यास यश तुमचेच आहे. अलीकडच्या काळात दर्जेदार मराठी चित्रपट निघत आहेत. त्यामुळे तरुणांनी मराठी कलावंतांना प्रोत्साहन द्यायला हवे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ सारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवून देऊन तुम्हा- आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून समाज सुधारण्याची संधी मिळत असते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा. म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी इतरांमधील चांगले गुण आत्मसात करून, सुजान नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. तसेच, आई-वडील आणि शिक्षकांचा मान ठेवून मोठे व्हावे.
एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले म्हणाले की, प्रत्येकाने एक तरी आयडियल व्यक्तिमत्व शोधून स्वतःमधील वेगळेपना जपावा. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत असते. ती दिशा आपणास पथनाट्याच्या माध्यमातून मिळाली आहे असे दिसत आहे. पथनाट्य हे समाजसुधारणेचे प्रभावी माध्यम असून या माध्यमाचा वापर करून भाऊराव कराडे बरोबरच इतरही अनेक कलावंत पुढे आले आहेत. विद्यार्थ्यांनी हिरो प्रमाणे जिद्द, चिकाटी, प्रयत्न यांचा वापर करीत जीवाच्या आकांताने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सुहास निंबाळकर व डॉ.सविता पाटील यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख कार्यक्रमाचे संयोजक व महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. आभार स्पर्धा समन्वयक सूर्यकांत सरवदे यानी मानले
विजयी कलावंतांवर बक्षिसांची बरसात
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी विभाग व विद्यार्थी मंच यांच्या वतीने ‘आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २२ महाविद्यालयांपैकी प्रथम क्रमांकाचा ‘कर्मवीर फिरता करंडक’ सी. के. गोयल महाविद्यालय, दापोडी (रु. ५०००), द्वितीय क्रमांक महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी (रु. ३००० व सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक एस. एम. सी. सी. कॉलेज (रु. २००० व सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ संघवी केशरी कॉलेज (१००० व सन्मानचिन्ह), बालाजी लॉ कॉलेज (उत्कृष्ट संहिता – कशासाठी पोटासाठी), उत्कृष्ट कलावंत पुरुषपात्र-अबिर तिवारी, स्त्रीपात्र अमिषा सोंडे, आदी कलावंत व महाविद्यालयांनी पारितोषिके मिळविली. त्या सर्व स्पर्धकांना आमदार रोहित पवार, भाऊसाहेब शिंदे व प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.