breaking-newsताज्या घडामोडीपुणेलेख

लोकसंवाद : गांधींची जमीन, बाबासाहेबांचा किल्ला!

लेखक, ज्ञानेश वाकुडकर.

बुद्धाचं तत्वज्ञान आणि बाबासाहेबांचा मोठेपणा याबद्दल वाद असण्याचे कारणच नाही. बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात काही मतभेद जरूर होते. ते स्वाभाविक देखील आहेत. पण त्यांचा त्यामागे काही स्वार्थ नव्हता. देश आणि समाजाचे कल्याण हाच दोघांचाही ध्यास होता ! दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत आणि महत्त्व माहीत होते. त्यामुळे संघर्षाच्या वेळी दोघांनाही दोन पावलं मागे यावे लागले असेल, तर ते त्यांनी मान्य केले. पुणे करार हे त्याचे उदाहरण आहे. दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर होते. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये दोघांचेही प्राधान्यक्रम वेगळे होते.

गांधींच्या समोर सारा देश होता. बाबासाहेबांच्या समोर जनावराचं जीवन वाट्याला आलेला मागासवर्गीय समाज होता. एकाला संपूर्ण देशाची मुक्ती हवी होती. दुसऱ्याला आपल्याच देशातील करोडो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून द्यायचा होता. एकाला जगाचा राजकीय इतिहास बदलायचा ध्यास होता. दुसऱ्याला मानवतेच्या इतिहासातील काळीकुट्ट पानं फाडायची होती. अशावेळी दोघांची तुलना करणे म्हणजे दोघांवरही अन्याय आहे.

एकदा प्राधान्य क्रम बदलला की सारी मांडणीच बदलून जाते. तेव्हा, मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून दोघांच्याही जगण्यातल्या चांगल्या गोष्टी घेवून आपल्याला पुढे जाता आले पाहिजे. पण पुन्हा पुन्हा गांधी आणि बाबासाहेब असा वाद उकरून काढणारे लोक हेच या दोन्ही महापुरुषांचे शत्रू आहेत, असे मला वाटते. अर्थात चिकित्सा झालीच पाहिजे. त्यात काही वाईट नाही. पण गांधींना शिव्या घालणारे लोक जास्त आक्रमक दिसतात. गांधीवादी मात्र तसे  आक्रमक होताना दिसत नाहीत. गांधींची निंदा नालस्ती करण्यात कोण कोणते लोक धन्यता मानतात, ते स्पष्टच आहे. पण बाबासाहेबांना महान ठरवण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची काय गरज आहे, हे मला अजूनही समजले नाही. तुम्हाला जो महापुरुष आवडतो, त्याला आदर्श मानून तसे वागा, त्यात कुणी अडवले ? बरं आपल्यासारख्या लोकांनी महान म्हटल्यामुळे कुणी महान होतो का ? किंवा लहान म्हटल्याने कुणी लहान होतो का ? जागतिक इतिहासाने या दोन्ही महापुरुषांची जी काय नोंद घ्यायची ती घेतलीच आहे !

कोणत्याही महापुरुषाची आंधळी  आणि अतिरेकी भक्ती त्या महापुरुषाच्या विचारांना हानिकारकच ठरत असते. एकदा आपण भक्ती किंवा व्यक्तीपूजेच्या मोड मध्ये गेलो, की विवेक हरवून बसतो. समजा देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं तर ? मग कसली घटना आणि कसलं आरक्षण ?

कसलं स्वातंत्र्य, कसली समता अन् कसली बंधुता ? गांधी – नेहरूंच्या मनात जर बाबासाहेबाबद्दल खरंच तसा द्वेष असता, कपट असते, तर घटना समितीत असूनही बाबासाहेबांचे प्रस्ताव, सूचना त्यांना सहज नाकारता आले असते. कारण शेवटी बहुमत तर त्यांचेच होते. पण तरीही जे त्यांना योग्य वाटले त्याचा स्वीकार केला, जे पटले नाही त्याचा इंकार केला. मात्र घटना लिहिण्याच्या विषयाला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे कळत नकळत बाबासाहेबांचा संघर्ष, त्याग याकडे आपण दुर्लक्ष करतो ! बाबासाहेबांनी घटना लिहिली याचंच आपल्याला भारी अप्रूप वाटते. एका मर्यादेपर्यंत ते ठीकही आहे. त्यांनी घटना लिहिली नसती तर आरक्षण वगैरे कदाचित मिळाले नसते. पण अन्य कुणीतरी घटना लिहिलीच असती ना ? जगात येवढ्या साऱ्या देशांना काय घटनाच नाहीत का ? काही देशात तर लिखित घटना नावाचा प्रकारच नाही. तरीही ते देश सुरळीत चालत आहेत. खरं तर आपल्याला कितीही बुलंद किल्ला उभारायचा असला, तरी त्यासाठी आधी जमीन आपल्या मालकीची असावी लागते. गांधींच्या नेतृत्वात उभा झालेल्या लढ्यातून देशाला हक्काची जमीन मिळाली. आणि त्यावर बाबासाहेबांनी समतेचा बुलंद किल्ला बांधण्याचा स्पष्ट आराखडा आपल्यासमोर ठेवला !

बाबासाहेबांचा संघर्ष मोठाच आहे. त्यागही मोठा आहे. त्याचं अनुकरण आपण करायला हवं. त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. असे महापुरुष रोज रोज पैदा होत नसतात. पण आपण इकडे बाबासाहेबांचं नाव घेतो आणि तिकडे समाजाशी बेइमानी करून स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करतो. समाजाला वाऱ्यावर सोडून देतो. अर्थात, ही शोकांतिका बहुधा साऱ्याच महापुरुषांच्या वाट्याला येत असते.

ओबीसी समाज हा भारतामध्ये ६० टक्के आहे. आणि हा प्रामुख्याने हिंदू आहे. हिंदूंची संख्या देशात ७८% आहे. म्हणजेच सुमारे १०० कोटी हिंदू भारतात राहतात. पण वर्णव्यवस्थेने यांना पार गुलाम करून ठेवले आहे. चातूर्वण्याच्या कसोटी प्रमाने हिंदू हे शूद्र आहेत. या वर्णवादी व्यवस्थेला कंटाळून बरेच हिंदू आधीच इस्लाम धर्माच्या आसऱ्याला गेलेत. कारण तिकडे असा जातीभेद नाही. मुस्लिम धर्मामध्ये ८०% लोक ओबीसी आहेत. खेड्यापाड्यात हिंदू आणि मुस्लिम गुण्या गोविंदाने राहतो. वर्धा जिल्ह्यातील मंगरूळ हे माझं गाव. तिथेही मुस्लिम समाजाची काही घरं होती. पण मी कधीही त्यांना धर्म या विषयावरून आपसात भांडताना पाहिलं नाही.

बाबासाहेबांचा जन्म हिंदू धर्मात झाला. त्या काळी हिंदू धर्मातील वर्णवादी लोकांनी उच्छाद मांडला होता. त्यातील विकृतीच्या विरोधात सुधारणावादी लोकांचे प्रयत्न देखील सुरूच होते. हिंदू धर्मातील विकृती नष्ट व्हावी, अशी बाबासाहेबांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आवाहन देखील केले. सुमारे २० वर्षे वाट पाहिली. पण त्याला हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेवटी नाईलाजाने त्यांना करोडो अनुयायासह हिंदू धर्म सोडून बुद्धाला शरण जावे लागले !

भगवान बुद्धांचा धम्म जरी बाबासाहेबांनी जवळ केला असला तरी महात्मा फुले, कबीर या महापुरुषांना बाबासाहेबांनी गुरु मानले होते. तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रेरणा घेतली, शाहू महाराजांपासून आरक्षणाचा विचार घेतला, यातले तीन महापुरुष तर हिंदू धर्मीय होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब निर्विवाद महान होते. करोडो लोकांचा उद्धार या एका महामानवाने सहज घडवून आणला. आपले सारे आयुष्य त्यासाठी पणाला लावले. दिवस रात्र एक केले. अनेक धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. जर हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी बाबासाहेबांचे ऐकले असते तर ? मानवतेचा इतिहास एका वेगळ्या उंचीवर गेला असता. मानवतावादी संतांची महान परंपरा आणि बाबासाहेबासारखा क्रांतदर्शी नेता असा अद्वितीय योग जुळून आला असता. आणि समतेच्या महामार्गावर हिंदू धर्माचा मानवतावादी प्रवास सुरू झाला असता.

अर्थात धर्म बदलला आणि धम्माचा स्वीकार केल्यामुळे लगेच मागास वर्गीय समाजातील सारी विकृती निघून गेली आहे असे नाही. मात्र काही महत्त्वाचे परिवर्तन जरूर झाले. जीवनमान कमालीचे सुधारले. वाचन संस्कृती आणि शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आर्थिक संपन्नता आली. पण मागासवर्गीय समजातल्या जाती मात्र अजूनही संपल्या नाहीत. ज्या नेत्यांनी आंतर जातीय विवाह केलेत, त्यांनी बहुधा उच्च वर्णीय मुलींशीच केले. त्यांना तथाकथित खालच्या जातीतील मुली का दिसल्या नाहीत ? की त्यांच्या लायकीच्या मुलीच पैदा झाल्या नव्हत्या, असे त्यांना म्हणायचे आहे ? म्हणजे माईक वरून समतेचा कितीही गजर केला, तरी मनातली उतरंड मात्र तशीच कायम आहे. खुद्द बाबासाहेब ज्या जातीत जन्मले त्या जातीतील साडे बारा पोटजाती तरी अनुयायांना का संपवता आल्या नाहीत ? बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातून प्रेरणा घेवून स्थापन झाला असल्याचा दावा करणारे आरपीआय चे २५ वेगवेगळे तंबू कसे काय ? त्यातले अनेक सेनापती वर्णवाद्यांच्या राशनवर जगतात ही निंदनीय बाब नाही का ? बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं प्रज्ञा – शील – करुणा ह्यातील शील अशावेळी नेमकं कुठं गहाळ होते ? ह्या गोष्टी धम्माला धरून आहेत का ? ह्या असल्या विकृतीच्या विरोधात मग लढा का उभारला जात नाही ? आरपीआय या पक्षाच्या बऱ्याच तुकड्यांचा आधार पोटशाखीय अस्मिता हाच आहे, ही वस्तुस्थिती नाही का ? त्यात घराणेशाही आणि कंपुगिरी नाही का ? असेल तर मग, बाबासाहेबांना हे आवडले असते का ? फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जप करत करत उत्तर प्रदेशात सत्तेत आलेल्या बीएसपी या पक्षात लोकशाही आहे का ? असेल तर तो लोकशाहीचा कोणता जगावेगळा प्रकार आहे ? तिथले मंत्री, पदाधिकारी नेतृत्वाची तात्विक चिकित्सा करू शकतात का ? नेतृत्वाच्या समोर गुलामासारखे उभे राहणे, ही कोणती समता आहे ? ही कोणती लोकशाही आहे ?

यावर आपण काही बोलत नाही. बोलू शकत नाही. मात्र तरीही स्वतःला विचारवंत, पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, समाजसेवक वगैरे वगैरे म्हणवून घ्यायची हौस जरूर आहे.. ती तर भागवायलाच हवी ! अशावेळी, मग आपण गांधींना पकडतो !  त्यांची हवी तशी निंदा नालस्ती करतो ! तसेही त्यांचे कुणी आंधळे भक्त नाहीत. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य असलेत, तरी ते त्यांच्या बाजूने भांडायला कधी रस्त्यावर येणार नाहीत, हे आपल्याला माहीत असते ! त्यामुळे गांधीचे कपडे फाडणे अगदीच सोपे काम ! तसाही तो म्हातारा बेवारसच ना ?

.. आणि शेवटी तसाही तो होता तरी कोण ? त्यानं घेतलेली बॅरिस्टर ही पदवी तर त्याला रद्दी मध्येच मिळाली होती नाही का ? एवढ्या मोठ्या खंडप्राय देशांनं त्याचं नेतृत्व स्वीकारलं, ते तर केवळ टाईम पास म्हणूनच नाही का ? शेवटी स्वातंत्र्याची लढाई म्हणजे तरी काय विशेष होती ? ती सुद्धा एक प्रकारची ट्वेन्टी – ट्वेन्टी मॅचच  होती ना ? बरं, गांधी – नेहरू हे लोक वारंवार जेलमध्ये गेलेत, कारण त्यांची घरी राहायची सोय नव्हती, म्हणूनच ना ? खरं तर, जे लोक इंग्रजांची दलाली करत होते त्यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ! हे गांधी नेहरू काय.. नुसते उडाणटप्पू तर होते ! गांधींची तर बॅरिस्टर असूनही अंगावर नीट कपडे घालायची सोय नव्हती, ते काय देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणार ?

…असा या देशातल्या काही  स्वयंघोषित महान विचारवंतांचा आव असतो ! थोडक्यात, जे आम्ही म्हणू तेच खरं ! जो आमच्या जातीचा असेल, तोच नेता सर्वात महान ! बाकी सब भंगार !-

ही अशी आक्रस्ताळी, एकांगी मांडणी करणारे विचारवंत काही कमी नाहीत. त्यामुळे बिचारे गांधीचे चाहते असोत, नेहरुंचे चाहते असोत की हिंदू धर्मातील ओबीसी समाज असो, एकप्रकारचा वैचारिक दहशतवाद बघून हादरून गेले आहेत. कावरा बावरा झालेले आहेत. आणि दुसरीकडे अर्ध्या हळकुंडातील पुस्तकी मांडणी दिवसेंदिवस आक्रमक होते आहे. अतिरेकी टोक गाठते आहे. ज्या वर्णवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचा बहाणा करून ह्या विचारवंता कडून जे काही वैचारिक बाँब टाकले जातात, ते तिकडे वर्णवाद्यांच्या घरावर पडण्या ऐवजी बिचाऱ्या ओबीसी, बहुजन हिंदूंच्या वस्त्यांवरच येवुन आदळतात. त्यांच्याच वस्त्या उध्वस्त होतात. आणि भेदरून मग हा हिंदू समाज पुन्हा वर्णवाद्यांच्या तंबूत आसरा शोधत असतो. वर्णवाद्यांचे काम आयतेच सोपे होते.-

खरं तर आताचे भाजपचे सरकार पुन्हा येण्याला किंवा संघाचा तंबू आणखी मजबूत होण्याला हे गांधी, नेहरूंचे विरोधक आणि हिंदूंच्या नावाने सारखी गरळ ओकणारे तथाकथित विद्वानच जास्त जबाबदार आहेत. केवळ चार टक्के ब्राम्हणांनी आम्हाला हजारो वर्षे लुटलं, आजही ते आम्हाला काम करू देत नाहीत,  अशीच मांडणी करणाऱ्या या लोकांची कीव येते. पण त्यांना स्वतःला आत्मचिंतन करण्याची कधीही गरज भासली नाही. आणि म्हणून स्वतःची निष्क्रियता, अपयश झाकायला गांधी – नेहरू – ब्राह्मण हे आयतेच बकरे सापडलेत ! तेवढे त्यांना पुरेसे आहे !-

समतावादी हिंदू धर्माचा विचार पुढे येण्याची गरज यातूनच निर्माण झाली. ज्या धर्माने बाबासाहेबांना असे तीन तीन गुरू / प्रेरणापुरुष दिले, तो धर्म एकदम निरर्थक कसा काय असू शकतो. समता, मानवतेवर निष्ठा असलेले आणखीही बरेच संत हिंदू धर्मात होऊन गेलेत, तो ठेवा आम्ही काय कचऱ्याच्या पेटीत फेकून द्यायचा का ? 

शेवटी धर्म किंवा धर्मांतर ही तांत्रिक बाब आहे. एखाद्या धर्माची शिकवण किंवा महापुरुषांचे विचार कितीही महान असू द्या, प्रत्यक्ष जीवनात  अनुयायी त्या तत्वाशी किती प्रामाणिक आहेत, यावरून त्याचा समाजावरील प्रभाव ठरत असतो. शिकलेल्या माणसांनीच मला धोका दिला, असे तेव्हा स्वतः बाबासाहेब का म्हणाले होते ? धर्म असो, संप्रदाय असो  की धम्म असो, काळानुरूप त्यातही अंधश्रद्धा, विकृती वेगवेगळ्या रूपाने विकसित होत असतात. त्याचा बंदोबस्त त्या त्या धर्मातील लोकांनीच करायचा असतो. केवळ कागदोपत्रीची  महानता व्यवहारात काही कामाची नाही ! म्हणूनच आत्मचिंतन करणे, जे जे विकृत असेल त्याचा त्याग आणि चांगलं असेल, त्याचा स्वीकार करणे, हाच योग्य पर्याय आहे. तेवढ्यासाठी समतावादी हिंदू धर्माची धडपड सुरू आहे.

केवळ चार लोक हजारो वर्षांपासून ८५ लोकांच्या छाताडावर बसून मूर्ख बनवत आहेत, हा दावा खरा असला तरी,  किंवा खोटा असला तरी, ८५ लोकांचीच बदनामी करणारा आहे, त्यांच्या योग्यातेबद्दल शंका उत्पन्न करणारा आहे. त्याचा सरळ अर्थ असा की, ते चार लोक खरंच हुशार असले पाहिजेत, मजबूत असले पाहिजेत आणि हे ८५ लोक तेवढेच बिनडोक असले पाहिजे, हेच त्यातून सिद्ध होत नाही का ? तेव्हा ह्या मानसिकतेतून लौकर बाहेर निघायला हवे. आत्मचिंतन करायला हवे. नवी आणि व्यावहारिक मांडणी करायला हवी. केवळ महापुरुषांच्या नावाचा गजर, आपल्या जातीची घमेंड आणि महापुरुषांच्या पराक्रमाचे कागदी पवाडे गाऊन हाती काही लागणार नाही. प्रामाणिकपणे मैदानात येवुन काम करावे लागेल. लोकजागर अभियान.. त्यासाठीच प्रयत्नशील आहे. समतावादी हिंदू धर्माची मांडणी त्यातूनच समोर आलेली आहे. त्यावर गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.

आजवर अनेक मान्यवरांनी स्वच्छ हेतूने विविध चळवळीच्या माध्यमातून भरपूर काम केले, आहे हेही मान्य करायला हवे. काही चुका झाल्या असतील, त्या आता दुरुस्त करायला हव्यात. कोणता महापुरुष केव्हा काय म्हणाला, यापेक्षा आजची परिस्थिती आमच्या समोर कोणती आव्हानं घेवून हजर झाली आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. त्या परिस्थितीशी कशी लढाई लढायची, याचे व्यावहारिक नियोजन करणे गरजेचे आहे. ते काम लोकजागर अभियानच्या माध्यमातून सुरू आहे. समतावादी हिंदू धर्म परिषद हा त्यातलाच एक भाग आहे.-

कोण स्वदेशी कोण विदेशी, कोण शाकाहारी, कोण मासाहारी ? कुणी कुणी गाईचे, बैलाचे मास खाल्ले ? कोण इथले, कोण बाहेरून आलेले ? ह्यावर वाद घालण्यात आमची केवढी शक्ती वाया जाते ? हजारो वर्षानंतर कसले हिशेब करत आहोत आपण ? हजारो वर्षांपूर्वी सारेच रानटी अवस्थेत होते. त्यावेळी कुणाचेही पूर्वज असोत पण त्यांनी गायी, बैल, म्हशी, घोडे, हत्ती, उंट सारेच  खाल्ले असणार ना ? आणि त्यात वावगे तरी काय ? ती अवस्थाच तशी होती ! पण आम्ही मात्र आज इकडे खाण्यापिण्याच्या प्रश्नावरून एकमेकांचे जीव घेत आहोत. जेव्हा कुटुंब व्यवस्थाच अस्तित्वात यायची होती, तेव्हा विवाह संस्था कुठून येणार ? मग त्या अवस्थेत नाते संबंध तरी कुठून आलेत ? मग बहीण कोण ? भाऊ कोण ? मामा कोण आणि मावशी कोण ? अशा परिस्थितीतही मानव वंशवृद्धी तर चालूच होती ना ?

जसा जसा काळ पुढे गेला, माणूस अनुभवातून शिकत गेला. सोयीचं असेल ते स्वीकारत गेला. बदलत गेला. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. मग आताचे संकेत आणि हजारो वर्षांपूर्वीच्या घटना ( त्याही किती खऱ्या, किती खोट्या याचा कुणी साक्षीदार नाही. काही उपलब्ध झालेले विस्कळीत, खंडित पुरावे, आणि त्यात वेगवेगळ्या लोकांच्या संशोधनाचे वेगवेगळे अंदाज, तर्क, वितर्क ) आणि त्यावरून आम्ही ठरवणार की तेव्हा चारित्र्य संपन्न कोण आणि चारित्र्यहिन कोण होतं ? आहे की नाही गंमत ? बरं आज त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काय संबंध आहे ? आणि तरीही असली निरर्थक पोपटपंची करणाऱ्या लोकांना आम्ही विद्वान मानणार ? त्यांच्या म्हणण्यानुसार दंगे करणार ? जातीनिहाय आपले महापुरुष वाटून घेणार ? गाई बैल वाटून घावेत, तसे नेत्यांचे हिस्से करणार ? याचा फोटो का नाही, त्याचा फोटो का नाही, यासाठी भांडणार ?

समतावादी हिंदू धर्म परिषदेला असल्या फोटोबाजित इंटरेस्ट नाही, घोषणाबाजीत इंटरेस्ट नाही. जे जे कुणी समतावादी आहेत, मानवतावादी आहेत, ते ते आमच्यासाठी आदर्श आहेत. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. त्यांच्याकडून जे जे हवे असेल ते ते आपण घेतले पाहिजे ! त्यांची शिकवण आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत अनेक मोठी माणसं होऊन गेली आहेत. ज्याला ज्याला जो जो समतावादी महापुरुष आपला वाटत असेल, त्याने तो खुशाल घ्यावा. त्या महापुरुषांचे विचार समजून घ्यावे आणि शिकवण मनापासून आचरणात आणावी. प्रत्येकाने हे इमानदारीने करायचं ठरवलं, तर सारा समाज आपोआप दुरुस्त होऊन जाईल. भांडण तंटे मिटून जातील. ना दंगे होतील, ना जाळपोळ होईल ! महापुरुषांची भाषणातून नावे घेतली, झेंडे नाचवले, नारे लावले, फटाके फोडले की काम झाले, ही मानसिकता आपल्याला सोडावी लागेल. अर्थात कमी अधिक प्रमाणात साऱ्यांच्याच चूका झाल्या आहेत, हे मान्य करावेच लागेल.- ज्या चूका झाल्या त्या झाल्या ! यापुढे वास्तव आणि व्यवहार याचा आधार घेवून नवी मांडणी करू या ! समतावादी हिंदू धर्माच्या भूमिकेकडे सकारात्मक नजरेने, खुल्या मनाने बघू या..! आणि आपले आपले घर साफ करत पुढे जावू या ! चालत राहू, काम करत राहू, चुकलोच तर पुन्हा.. चूका दुरुस्त करत राहू !

साभार :

लेखक : ज्ञानेश वाकुडकर

अध्यक्ष, लोकजागर अभियान, नागपूर.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button