राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे उघड करावी: आंबेडकर
![Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar criticises NCP over Dhananjay Munde rape allegations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sharad-pawar-prakash-aambedkar.jpg)
पुणे – एल्गार परिषदेच्या प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. ही बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करून केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे उघड करावे. या कागदपत्रांद्वारे मोदी सरकारचा आणि तत्कालीन फडणवीस सरकारचा पर्दाफाश होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे सुरू असतानाच राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एल्गार प्रकरण बोगस असल्याचं सांगितलं. तसेच एल्गार प्रकरणी तयार करण्यात आलेली कागदपत्रेही बनावट असल्याचं पवारांनी पत्रात नमूद केलं असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे जनतेला माहीत पडेल, असं आंबेडकर म्हणाले. पवार वंचित आघाडीच्या या विनंतीला मान देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पवार आता आंबेडकरांच्या मागणीला कसे उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.