रानडुकरांच्या शिकारीसाठी ठेवला गावठी बाॅम्ब, मेलं पाळीव कुत्रं
![Indonesia shakes! Horrific bombing in front of the church; Fragments of corpses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/bom-blast-67_201905236558.jpg)
पवनानगर – महागाव येथील शेतकरी सोपान मारुती घारे यांच्या पाळीव कुत्र्याने गावठी बॉम्ब चघळल्याने स्फोट होऊन कुत्र्याचा मुत्यू झाला. पवनमावळ परिसरातील दुर्गम भागात काही जण रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरतात. काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी येथे अशाच पध्दतीने रानडुकराच्या शिकारीसाठीच्या गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात बैलाचा मुत्यू झाला होता.
घारे यांचा पाळीव कुत्रा घराभोवती फिरत असताना तो बॉम्ब कुत्र्याला दिसला. कुत्र्याने तो बॉम्ब चघळला. त्यामुळे कुत्र्याच्या जबड्यात त्याचा स्फोट झाला. यात जबडा छिन्नविछिन्न होऊन कुत्र्याला मोठी इजा झाली. काले कॉलनी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले. मात्र दुखापत मोठी असल्याने कुत्र्याचा मुत्यू झाला. यासंबंधी गावकऱ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पवनमावळ हा परिसर दुर्गम भाग आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्याची शिकार केली जात आहे. त्यासाठी स्फोटके वापरली जात आहेत. याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.