राज्यपालांना विमानातुन उतरवणार सरकार पाहिले नाही – देवेंद्र फडणवीस
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
पुणे । प्रतिनिधी
खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानातून उतरविलं गेलं. त्यांचा अपमान करणारं इतका इगो असलेले सरकार यापूर्वी पाहिलं नाही. हे अत्यंत चुकीचं असून कुठल्या पदाचा आपण अपमान करत आहोत? राज्यपाल ही केवळ व्यक्ती नाही. व्यक्ती येते, व्यक्ती जाते. त्यांचा असा अपमान करणं योग्य नाही. सरकारला इतका प्रचंड इगो कशाचा आहे, असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे महापालिकेत आढावा बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सहकार्य न केल्यामुळे राज्यपालांसोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकाराबाबत फडणवीस म्हणाले, मी ऐकलेला हा सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर आपल्या पद्धतीप्रमाणे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र द्यावे लागते. त्यानुसार, प्रशासन पुढील आदेश काढते. याबाबत मी माहिती घेतली असून सामान्य प्रशासन विभागास तसे पत्र कालच देण्यात आले होते.
त्यानंतर, सामान्य प्रशासन विभागाने फाइल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. असे असताना राज्यपाल पोहोचल्यानंतर त्यांना सरकारी विमानातून उतरविणे हे योग्य नाही.
राज्याच्या इतिहासात इतकं इगो असलेलं सरकार यापूर्वी पाहिलं नाही. इतका प्रचंड इगो कशाचा आहे? मला वाटतं हा पोरखेळ सुरू असून हे निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले.