मुख्यमंत्री साहेब माझे लग्न होत नाही, इच्छामरणाची परवानगी तरी द्या.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/001_1557559438.jpg)
– पुण्यातील एका कंटाळलेल्या युवकाचे सीएम फडणवीस यांना पत्र
पुणे – लग्न जमत नसल्याने एका युवकाने आत्महत्येचा इशारा दिला आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या या तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रातून त्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. युवकाचे पत्र मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. तसेच पुण्यातील आयुक्तांना यासंदर्भात सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचे पाहता पोलिसांनी सुद्धा वेळीच तरुणाकडे धाव घेतली आणि त्याची व्यवस्थित समजूत काढली. नैराश्यात सापडलेल्या या युवकाचे समुपदेशन करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पुण्यातील या युवकाने मुख्यमंत्र्यांकडे इच्छमरणाची मागणी करताना एक भावनिक पत्र पाठवले. त्यानुसार, हा युवक आपल्या घरातील एकुलता एक मुलगा असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचे लग्नच जमत नाही. तो बेरोजगार आहे असे मुळीच नाही. त्याला चांगली नोकरी देखील आहे. त्याने आपले संपूर्ण गाऱ्हाणे या पत्रातून मांडले आहे. त्याने लिहिले, “मी माझ्या नाकरतेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करत आहे. मी आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मी 37 वर्षांचा एक अवविवाहित तरुण आहे. मी नोकरी करतो. मला 25000 हजार रुपये मासिक वेतन आहे. माझी आई 73 वर्षांचीअ असून तिला दुर्धर आजार आहे. माझ्या वडिलांचे वय सुद्धा 81 वर्षे आहे. माझी घरची परिस्थिती अतिशय सामान्य आहे. मला माझे अस्तित्व बनवायचे आहे. परंतु, या जगाने मला हे करण्यासाठी अपात्र ठरवले आहे. माझ्यामुळे कुणीही सुखी राहू शकत नाही. मी एकुलता एक मुलगा आहे आणि आई-वडिलांची सेवा करेल अशी जोडीदार मिळत नाही.”