मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूकशिस्त आणखी कठोर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Mumbai-Pune-express-way.jpg)
- महिनाभरात नियम मोडणाऱ्या १५ हजार चालकांवर कारवाई
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवून मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिन्यात महामार्ग पोलिसांनी १५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली. मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या ५०० हून अधिक वाहनांवर सध्या दररोज कारवाई केली जात असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ९४ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचा वापर जड वाहने, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच मोटारचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. द्रुतगती मार्गावर जड वाहनांसाठी तसेच मोटारचालकांसाठी मार्गिका निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकदा वाहनचालक मार्गिकेची शिस्त मोडून बेदरकारपणे वाहने चालवितात. अशा प्रकारांमुळे वाहतूक विस्कळीत होते, त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते.
महामार्ग पोलिसांनी जुलै महिन्यात शहरातील प्रमुख वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महामार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. मार्गिकेची शिस्त मोडली जाऊ नये तसेच महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळावेत, या व अशा विविध सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई शिथिल केली होती.