मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगावतील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/drowing-101999_202011514803.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
मासे पकडण्यासाठी तळ्यावर गेलेल्या मामा भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथे आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. संजय शिवराम केदारी (वय 32) व ऋषिकेश विजय काळे( वय 8 दोघे मूळ रा. पहाडदरा सध्या रा.लाखनगाव ता.आंबेगाव) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांना तळ्याच्या बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्याच्या पूर्व भागात लाखनगाव येथे महादेवाचे तळे आहे.आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूर शेतात काम करण्यासाठी लाखनगाव गावात मागील चार वर्षापासून स्थायिक झाले आहेत. त्यातील चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी सकाळी गेले होते. यामध्ये मामा भाच्याचाही समावेश होता. मासे पकडण्यासाठी संजय केदारी व ऋषिकेश काळे हे पाण्यात उतरले.
मासे पकडत असताना 10 ते 12 फूट खोल असलेल्या तळ्यामध्ये गाळात अडकून संजय शिवराम केदारी व ऋषिकेश विजय काळे हे पाण्यात बुडाले गेले. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या तळ्याच्या बाजूलाच शेतात काम करणारे विक्रम राजाराम धरम, बाळासाहेब फकिरा धरम यांना रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तळ्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी गेले असता दोन जण बुडाल्याची माहिती त्यांना मिळाली. दोघांनी तात्काळ तळ्यात उडी मारून तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर बुडालेल्या दोघांना दुपारी साडेबाराच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढले.