‘माढा’ साठी संजय शिंदेंचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/1-3.jpg)
सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा, परंतु भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेचा केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात बुधवारअखेर तब्बल 30 उमेदवारांनी 37 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख व इतर 10 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत.
निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींमुळे माढा लोकसभा मतदासंघ राज्यभर चर्चेत आला. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच चुरस होणार आहे. दरम्यान, भाजपने तीन दिवसांपूर्वीच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. निंबाळकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी संजय शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. बुधवार, 3 एप्रिल रोजी संजय शिंदे यांनी शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे यांनी तब्बल चार अर्ज दाखल केले. शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवारांसह विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे आ. गणपतआबा देशमुख, आ. बबनदादा शिंदे, रश्मी बागल, माजी आ. दीपक साळुंखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, याच दिवशी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही भाजपकडून पूरक अर्ज दाखल केला. ना. देशमुख यांच्यासोबत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व नुकतेच भाजपमध्ये आलेले कल्याण काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. अखिल भारतीय एकता पार्टीच्या ब्रह्कुमारी प्रमिलाबेन, बहुजन आझाद पार्टीच्या मारूती केसकर, अपक्ष सह्याद्री कदम, संतोष बिचकुले, विश्वंभर काशीद, मोहन राऊत, अजिंक्य साळुंखे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.