माढा लोकसभेसाठी मोहिते-पाटलांना पुन्हा संधी ; पक्षाची उमेदवारी देण्यास माझा पाठिंबा – छगन भूजबळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-5-34.jpg)
अकलूज – माढा लोकसभा मतदारसंघात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना पक्षाची उमेदवारी पुन्हा मिळण्यासाठी आपली सर्व शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. अकलूज मुक्कामी भुजबळ यांनी खासदार मोहिते-पाटील यांच्याशी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चाही केली. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यास आपणांस येता आले नव्हते. त्यामुळे आता आवर्जून आल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी लोकसभेसाठी माढय़ातून निवृत्त महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख हेदेखील इच्छूक असल्याबाबत लक्ष वेधले असताना भुजबळ यांनी, देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारली. उलट त्याचा लाभ मोहिते-पाटील यांनाच होण्याचे भाकीत वर्तविले. आपण लोकसभा निवडणूक लढविणार की विधानसभा या प्रश्नावर बोलताना त्यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील असे सांगितले. पक्ष सांगेल त्याप्रमाणे आपलाही निर्णय राहील, असेही नमूद केले. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी साफ झिडकारल्याचे सांगताना, आता देशात भाजपचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाल्याचा दावा भुजबळ यांनी यावेळी बोलताना केला.