महिलेचे डोळे फोडणाऱ्या ‘त्या’ नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे |महाईन्यूज|
न्हावरे येथे महिलेची छेड काढून तिचे डोळे फोडणाऱ्या खळबळ माजविणाऱ्या घटनेतील नराधमाला आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि. ९) अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तपास पथकाचे कौतुक करून त्यांना ३५ हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडी सुपे ता. बारामती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शिक्रापुर येथे येत पथकाचे काैतुक केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देत पारितोषिकही जाहिर केले.
या घटनेत मुक्ता राजु चित्रे या जखमी झाल्या होत्या. त्या मंगळवारी (दि ३) रात्रीच्या वेळी नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही डोळे निकामी केले होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीने जोर धरला होता.
जखमी महिलेकडून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर आरोपी हा कुंडलिक साहेबराव बगाटे (रा. उंडवडे सुपे ता. बारामती) असल्याचे समजले. आरोपीला पकडण्यासाठी तपासपथके रवाना करण्यात आली होती. तपासात ग्रामसुरक्षा दलांचीही मदत घेण्यात आली. मात्र, पाच दिवसांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले.या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. हा आरोपी शिक्रापुरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक हरीष शितोळे हे शिक्रापूर चाकण चौकात तपासणी करित असताना या आरोपीला अटक केली.