महापालिका विषय समित्यांची सभापती निवड येत्या गुरुवारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/pcmc-main-building-13.jpg)
सभापती पद मिळावे म्हणून इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
पिंपरी – महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितीची सभापती निवड येत्या गुरुवारी (दि.10 मे) होणार आहे. यावेळी समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर हे पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. मात्र, सभापती पद मिळावे म्हणून इच्छुकांनी नेत्यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे. सभापती पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीमध्ये नवीन नगरसेवकांची 20 एप्रिलच्या महासभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील तैालनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली.
यामध्ये विधी समिती:- माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, उषा ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे (भाजपा), सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)
महिला व बाल कल्याण समिती:- हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे (भाजप), मंगला कदम, स्वाती काटे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीनल यादव (शिवसेना)
क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती:- अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संजय नेवाळे, अश्विनी बोबडे (भाजप), अनुराधा गोफने, अपर्णा डोके, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना), शहर सुधारणा समिती:- सीमा चोघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड (भाजप), वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), निलेश बारणे (शिवसेना) या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त डॅा दिपक म्हैसकर यांनी चार विषय समित्यांच्या सभापती निवड 10 मे रोजी निश्चित करण्याचे कळविले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात शनिवारी (दि.5) दुपारी 3 ते 5 यावेळी सभापती पदाचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील मधुकरराव पवळे सभागृहात निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे चारही विषय समित्यांची सभापती निवड प्रक्रिया सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचे कामकाज होणार आहे.