मंदोशी परिसरात पुन्हा एकदा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ
![Shocking! The body of an 89-year-old mother was found hidden in the house at a cost of Rs 43 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/murder-crime.jpg)
पुणे : पुन्हा एकदा झुडपात अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. खेड तालुक्यातील भिमाशंकर रोडवर मंदोशी परिसरात रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सदर भागात काही महिन्यापूर्वी अशाचप्रकारे एका पुरूषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता अशी माहिती खेड पोलिसांनी दिली.
मंदोशीतील बांगर वस्तीमध्ये राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी दि. ३१ मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भिमाशंकर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. बांगर वस्तीजवळील कॉर्नरजवळ आले असता त्यांना दुर्गंधीचा वास आला. त्यांनी झुडपात जावून पाहिले असता त्यांना एक मृतदेह अर्धवट जळालेला दिसून आला. या प्रकरणी खेड पोलिसांना माहिती देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाचे वय अंदाजे तीस एवढे आहे. तो जळाल्याने तो स्त्रीचा आहे की पुरूषाचा याबाबत अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. दरम्यान, मंदोशी भागात काही महिन्यांपूर्वी असाच अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाच्या हातावर टॅटू गोंदलेला होता. याप्रकरणाचा तपास खेड पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक निलेश बडाख, महिला उपनिरीक्षक पडवळ या करीत आहेत.