breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भीमाशंकरच्या जंगलात शेकरूची होणार गणना

पुणे |महाईन्यूज|

महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह व भीमाशंकरचे वैभव असलेल्या शेकरूची आजपासून (सोमवार) भीमाशंकर जंगलात गणना होणार आहे. कोविडच्या धर्तीवर फक्त वनकर्मचारीच यामध्ये सहभागी होणार असून सात दिवस ही गणना चालणार आहे. शेकरू गणनेत घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसणा-या शेकरूंची नोंद घेऊन ही गणना होणार असून यातून निश्चित आकडेवारी व अधिवासाचे ठिकाण समजाणार आहे.

सहयाद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेल्या भीमाशंकर ते राजमाची यातील जंगल परिसरात शेकरूंचा अधिवास आहे. भीमाशंकरचे जंगल शेकरूसाठी प्रसिद्ध असून स्थानिक लोक या शेकरूला ‘भीमाशंकरी ‘ असेही म्हणतात. जैव विविधतेने समृद्ध अशा नैसर्गिक वनांचे निदर्शक असल्याने भीमाशंकरमधील शेकरूचे संवर्धन करण्यासाठी 1985 साली शासनाने येथील जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. तसंच शेकरूच्या संवर्धनासाठी नुकतेच भीमाशंकर अभयारण्याचे पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र जाहीर झाले आहे.

शेकरूची वरची बाजू करडया रंगाची तर पोट पांढऱ्या रंगाचे असते. हा प्राणी एकट्याने राहतो, प्रत्येक शेकरू दिसायला वेगवेगळे असता. हा प्राणी स्वत:चा एक प्रादेशिक प्रदेश ठरवून घेणारा, सर्वसाधारणपणे झाडावर रहाणारा, प्रामुख्याने फळे खाणारा, फळे नसतील तर बीज, झाडांची फुले, साल खाणारा प्राणी आहे. शेकरूचे आयुष्य 8 ते 9 वर्षाचे असते. शेकरू वर्षातून एक वेळा एका बछड्याला जन्म देतो. एक मादी दरवर्षी प्रजनन करेल असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाटयाने वाढत नाही. सर्प व गरूड शेकरूची शिकार करतात. भीमाशंकर अभयारण्यात ही गणना जीपीएस व जीओटॅग मॅपवर नोंदी घेवून केली जाणार आहे. यासाठी वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. पावसाळ्या अगोदर शेकरू नवीन घरटी बनवतात. त्यामुळे मे व जून महिन्यात शेकरूंची गणनना केली जाते. अभयारण्यात असलेल्या 19 बिटांमध्ये ही गणना होणार आहे.

ज्या झाडावर शेकरूचे घरटे आहे त्या झाडाखाली उभे राहून जीपीएसमध्ये त्याची नोंद घेतली जाते. या नोंदीमध्ये दिनांक, शेकरूचे घरटे असलेले ठिकाण, घरटे असलेल्या झाडाचे नाव, घरटे नवीन की जुने याची नोंद, सोडून दिलेले घरटे, पिल्लाचे घरटे, वेळ, घरट्याच्या जवळ शेकरू दिसल्यास त्याचे वर्णन, अक्षांश रेखांश, घरट्याचा आकार, घरटयांची संख्या अशा प्रकारे नोंद घेतल्या जातात. शेकरूवर अभ्यास केलेल्या संशोधिका रिनी बोर्जेस यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शेकरू गणनेसाठी केला जाणार आहे.

शास्त्रीय पद्धतीने होणार गणना

शेकरू गणना ही शास्त्रीय पद्धतीने होणार आहे, यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग जंगलातील पुढील नियोजनासाठी होतो. ही गणना स्वत: वन कर्मचारी करणार आहेत. यामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तिला सहभागी होता येणार नाही. तसंच ज्या कर्मचाऱ्यांना कोविडची लक्षणे आहेत, त्यांना यामध्ये भाग घेता येणार नाही. तसंच गणनेमध्ये कुठेही प्राणी हाताळले जाणार नाहीत. भीमाशंकर प्रमाणेच महाबळेश्वर, फणसाड व आलापल्ली येथे गणना होणार असल्याचे शेकरू गणना प्रशिक्षक व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसरंक्षक एस.वाय.जगताप यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button