बारामती पॅटर्न’चा राज्यासमोर आदर्श घालून देवू – अजित पवार
![Ajit Pawar cancels decision to spend Rs 6 crore on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ajit-pawar.jpg)
कोरोनाचा बारामतीत ही एक रुग्ण सापडला आहे. हे संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरून न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोणीही घरा बाहेर न पडता एकसंघता आणि संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण ‘लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊया, असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.