“फर्ग्युसन’समोर पतित पावन संघटनेचा “सत्यनारायण’
पुणे – फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेवरुन निर्माण झालेला वाद कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पतित पावन संघटनेने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा घातली. या पूजेद्वारे संघटनेने प्रशासनाचे समर्थन करतानाच विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे.
गेल्या आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्यनारायण पूजेची गेल्या 40 वर्षांची परंपरा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले होते. मात्र, या पूजेला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. घटनेच्या मूलभूत तत्त्वानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे धार्मिक विधी, सण, उत्सव इमारतीच्या भिंतीवर धार्मिक घोषवाक्य लिहिणे, धार्मिक प्रतिमा लावणे संविधानानुसार निषिद्ध असल्याचे काही विद्यार्थी संघटनांचे म्हणणे होते.
फर्ग्युसनमधील पूजेचा वाद ताजा असतानाच मंगळवारी पतित पावन या विद्यार्थी संघटनेने प्रवेशद्वाराजवळ सत्यनारायणाची पूजा घातली. हिंदूंच्या सणावर आजवर अनेक वेळा संघटनांकडून आक्षेप घेतला गेला, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भविष्यात हिंदू सणांस विरोध केल्यास आमच्या स्टाइलने उत्तर दिले जाणार असल्याचे सीताराम खाडे यांनी दिला आहे. यावेळी स्वप्नील नाईक, शिवाजीराव चव्हाण, दिनेश भिलारे, गोकुळ शेलार, धनंजय क्षीरसागर, संतोष शेंडगेसह आदी उपस्थित होते.