प्रवाशांचे दागिने व मोबाइल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
पुणे – पीएमपी प्रवाशांचे दागिने आणि मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने पकडले.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मंगेश बाळू जाधव (वय २५, रा. पापडे वस्ती, हडपसर), उमेश राजू बिडलान (वय २३,रा. सय्यदनगर, हडपसर), शिवाजी विजय गौड (वय २१,रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
मागील काही दिवसांपासून पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करून महिला प्रवाशांच्या पिशवीतील दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता.ताडीवाला रस्ता भागात काहीजण चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार दिनेश गडांकुश यांना मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताडीवाला रस्ता भागात सापळा लावून जाधव, बिडलान, गौड यांना पकडले. चौकशीत त्यांनी पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविल्याची कबुली दिली. चोरट्यांनी पाच गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जाधव या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत दागिने आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव, गडांकुश, अस्लम पठाण, अजय खराडे, किशोर वग्गू, विशाल भिलारे, अजित फरांदे, चंद्रकांत महाजन, कादिर शेख, गोपाळ मदने आदींनी ही कारवाई केली.